पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील शाळेत, तसेच शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण, लोकसहभागातून शाळा विकास अशा कामगिरीची राज्य शासनाने दखल घेतली आहेत. त्यामुळे या प्रारुपाची आता राज्यात अंमलबजावणी करण्यात येईल, अशा घोषणा शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केली.

‘टी ४’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ स्पर्धेत जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळा ‘कम्युनिटी चॉइस ॲवॉर्ड’ या पुरस्काराची मानकरी ठरली. या पार्श्वभूमीवर भुसे यांनी शाळेला भेट देऊन ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यापूर्वी त्यांनी वाबळेवाडी शाळेलाही भेट दिली.

आमदार बाबाजी काळे, राज्याचे शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, योजना विभागाचे संचालक कृष्ण कुमार पाटील, सहसंचालक हारुण आत्तार, उपसंचालक गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, विविध जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षक या वेळी उपस्थित होते. भुसे यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक दत्तात्रय वारे, शाळेकरिता जागा देणाऱ्या व्यक्ती, सीएसआर निधी देणाऱ्या सामाजिक संस्थांचा सत्कार करण्यात आला.

याच कार्यक्रमावेळी जालिंदरनगर शाळेत रोबोटिक्स, कोडिंग, सिम्युलेशन कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित सृजन प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

भुसे म्हणाले, शिक्षक दत्तात्रय वारे यांनी जिल्हा परिषद वाबळेवाडी आणि जालिंदरनगर येथील शाळा लोकसहभागातून विकसित केली. शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, सामाजिक सेवाभावी संस्था यांनी जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेला राज्य, देश आणि जागतिक पातळीवर नावलौकिक, मानांकन मिळवून दिले. गावाने ठरवले तर शाळेच्या विकासाचे चित्र बदलणे शक्य असल्याचा आदर्श ग्रामस्थांनी घालून दिला आहे. वारे यांचे काम प्रेरणादायी आहे. ग्रामस्थांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

सिंह म्हणाले, वाबळेवाडी, जालिंदरनगरख्या शाळा निर्माण करून विद्यार्थ्यांना कोडिंग, सिम्युलेशन, रोबोटिक्ससारखे आधुनिक शिक्षण देण्याचा राज्यातील प्रत्येक शिक्षकाने निर्धार केला पाहिजे. शहरातील मोठमोठ्या शाळांतील सुविधा ग्रामीण भागातील शाळेत लोक सहभागातून निर्माण केल्या आहेत. त्यात वारे यांची जिद्द, तळमळ, लोकसहभाग महत्वाचा आहे. समाजातील दानशूर व्यक्ती हे उपक्रमशील शिक्षकांना मदत करण्यास तयार आहेत.

समाजात जिल्हा परिषदेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन दुय्यम दर्जाचा आहे. जालिंदरनगर शाळेचे जागतिक पातळीवरील यश हे त्या दृष्टिकोनाला दिलेले उत्तर आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्ता आहे. त्यामुळे आगामी काळात गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन जिल्हा परिषद शाळा जागतिक पातळीवर नेण्यासाठी इच्छाशक्ती, दृढ संकल्प, सातत्य आणि लोकसहभाग महत्वाचा आहे, असे वारे यांनी नमूद केले.

शिक्षकांची डाटा बँक

२६ जानेवारीला विश्वविक्रम

राज्यातील अनेक प्रतिभावंत, उपक्रमशील शिक्षक असून ते समर्पित भावनेने कार्यरत असतात. त्यांनी वाबळेवाडी आणि जालिंदरनगर या उपक्रमशील शाळेचे अनुकरण करावे. शिक्षण विभागाकडून अशा समर्पित भावनेने काम करणारे शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांची ‘डाटा बँक’ तयार करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती भुसे यांनी दिली. तसेच येत्या २६ जानेवारी २०२७ रोजी राज्यात एकाच वेळी देशभक्तीपर गीतावर कवायत आयोजित करून विश्वविक्रम करण्याचा निर्धार करण्याचे आवाहन भुसे यांनी केले. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे सराव सुरु करण्याचा सूचनाही भुसे यांनी दिल्या.

२५ शाळांमध्ये प्रयोगशाळा

पुणे जिल्ह्यात ‘मॉडेल स्कुल’ उभारण्यात येत आहेत. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे आरोग्यपत्र, इस्रो-नासा संस्था भेट असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. २५ शाळांमध्ये सृजन प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत. येत्या १३, १४ नोव्हेंबर रोजी पुणे येथे शिक्षक, विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलन आयोजन केले जाणार आहे, असे पाटील म्हणाले.