पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दहा दिवस दप्तरविना शिक्षण होणार आहे. या दहा दिवसांमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन सुतारकाम, बागकाम, मातीकाम अशी व्यावहारिक कौशल्ये, सर्वेक्षण, भेटी, सहली असे उपक्रम राबवले जाणार आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या बाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र आनंददायी करण्यासह त्यांना व्यावहारिक कौशल्ये, हस्तकौशल्ये, अनुभवाधिष्ठित शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने दहा दिवस दप्तराविना असणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) ही शिफारस केली आहे. या शिफारसीनुसार नियमित अध्यापन-अध्ययन प्रक्रियेचा भाग म्हणूनच हा उपक्रम राबवला जाणार आहे. भोपाळस्थित पीएसएस केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्थेने काही राज्यांतील शाळांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवला होता. त्यातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये शिकण्यात रस असण्यासह दप्तराविना दिवसांचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

हेही वाचा >>> पुण्यातून बेपत्ता झालेला शाळकरी मुलगा मध्य प्रदेशात सापडला… पोलिसांनी ‘असा’ लावला शोध

विद्यार्थी सरासरी सहा तास आणि वर्षभरातील सुमारे एक हजार तासांपेक्षा जास्त वेळ शाळेत असतात. किमान दहा दिवस किंवा साठ तास दप्तरविना दहा दिवस उपक्रमासाठी द्यायचे आहेत. विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरच्या जगाचा अनुभव देण्यासाठी, दैनंदिन आयुष्यात योगदान देणारे व्यवहार समजावून देण्यासाठी आणि निरीक्षणांवर आधारित शिक्षणाची क्षमता विकसित करण्यासाठी, समाजाशी जोडलेले राहण्यासाठी दप्तराविना दिवस उपक्रम महत्त्वाचा आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी करून पाहता येणार असल्याने त्यांना स्थानिक व्यावसायिकांची माहिती होईल, तसेच श्रमप्रतिष्ठेचा प्रचार होईल. विद्यार्थ्यांना अन्य क्षेत्रातील कौशल्यांचीही गरज लक्षात येईल. त्याचा त्यांना भविष्यातील करिअरची दिशा ठरवण्यासाठीही उपयोग होईल, असे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> खेडकरांना आयएएसमधून डच्चू; ‘यूपीएससी’ची कारवाई, भविष्यातही कायमस्वरुपी प्रतिबंध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपक्रम कसा असेल?

दहा दिवस दप्तराविना उपक्रम तीन संकल्पनांमध्ये विभागण्यात आला आहे. त्यातील विज्ञान पर्यावरण आणि तंत्रज्ञान या संकल्पनेत विद्यार्थी पक्ष्यांचा अभ्यास करतील, तसेच माती, पाणी, वनस्पतींच्या चाचण्या करतील, सौर ऊर्जा, बायोगॅस प्रकल्पाला भेट देतील, कृत्रिम बुद्धिमत्ता, विदा विज्ञान, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा, ड्रोन प्रशिक्षण, कचरा विलगीकरण अशा विषयांवर त्यांच्यासाठी व्याख्याने, कार्यशाळा ठेवता येतील. शासकीय कार्यालये, स्थानिक उद्योग आणि व्यवसाय या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थी ग्रामपंचायत, रुग्णालये, पोस्ट कचेरी, बँक, दुग्धशाळा अशा ठिकाणांना भेट देतील, तर कला, संस्कृती आणि इतिहास या संकल्पनेत बाहुल्या तयार करणे, नृत्य, नाट्य, पुस्तकमेळ्याला भेट, राष्ट्रीय वारसा स्थळाला भेट, असे उपक्रम करता येतील.