पुणे : राज्यातील विविध ५१ तालुक्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १८ सप्टेंबर रोजी होणार असून त्यासाठी १२ ऑगस्टपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील ६३ ग्रामपंचायतींचा समावेश असून या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड थेट पद्धतीने होणार आहे. १८ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार असून १९ सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्या निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तालुक्यांचे तहसीलदार १८ ऑगस्ट रोजी निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करणार आहेत. ग्रामपंचायतींसाठी २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. अर्जाची छाननी २ सप्टेंबर रोजी, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ६ सप्टेंबर आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, समर्पित राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा राखीव असणार आहेत. जिल्ह्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून त्यामध्ये जुन्‍नर तालुक्यातील ३८, आंबेगाव तालुक्यातील १८, खेडमधील पाच आणि भोर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.