पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणात आवश्यक भूसंपादनासाठी ७५ कोटी खर्च करण्यास मंगळवारी वित्तीय समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे या रस्त्याच्या भूसंपादनासाठी २१५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामधील १३० कोटी रुपये पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरले आहेत.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून १४० कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र, भूमी अभिलेख मोजणी विभागाच्या संथ कारभारामुळे हे भूसंपादन रखडले आहे. राज्य सरकारकडून भूसंपादनासाठी आलेल्या १४० कोटींपैकी अवघे ९ कोटी ५७ लाख रुपये खर्च झाले आहेत. या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे असल्याने हे काम प्राधान्याने करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आहे.
महापालिकेच्या वित्तीय समितीच्या बैठकीत मंगळवारी या रस्त्याच्या भूसंपादनासाठी ७५ कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. या रस्त्याचे काम काही भागात झाले असून, ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. ज्या मालकांच्या जागा महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आहेत. तेथे महापालिकेच्या वतीने रस्ता बांधला जात आहे. तर काही ठिकाणी ‘हस्तांतरणीय विकास हक्क’ (टीडीआर) देऊन भूसंपादन करण्यात आले आहे.
पावसाळी लाईन टाकणार
महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी मंगळवारी कात्रज-कोंढवा रस्त्याची पाहणी केली. राजस साेसायटी, एसबीआय बँकेच्या समोर पाणी साचत असल्याने येथे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तीनशे मिलीमीटर व्यासाच्या दोन लाईन टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पावसकर यांनी सांगितले.