लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सोलापुरात शुक्रवारी राज्यात सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज होता. मात्र, तशी स्थिती दिसून आली नाही. रविवारी आणि सोमवारी विदर्भात गारपीट होण्याचा, तर मंगळवारी, गुढीपाडव्याच्या दिवशी राज्याच्या बहुतेक भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सोमवारी सोलापुरात सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात शुक्रवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. प्रत्यक्षात गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सरासरी ०.५ अंश सेल्सिअसने तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. विदर्भात आज, शनिवारीही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील तीन दिवस रात्रीच्या उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार

राज्यात सोमवारी सोलापूरसह कोल्हापूर, मालेगाव, उस्मानाबाद, परभणी, बीड आणि विदर्भात बुलडाण्याचा अपवादवगळता सर्वत्र पारा ४० अंशांच्या वर गेला होता. पुढील दोन दिवस पारा ४० अंशांवरच राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी चांगला पाऊस झाल्यास कमाल तापमानात किंचित घट होऊ शकते.

मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी ४० अंशांवर राहिले. विदर्भात पारा सरासरी ४२ अंशांवर होता. उष्णतेच्या लाटेचा इशारा असूनही गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी सरासरी ०.५ अंशांनी तापमान कमी राहिले. विदर्भात उष्णतेची लाट दिसून आली नाही. मराठवाड्यात सरासरी तापमान ४० अंशांवर राहिले. कोकण किनारपट्टीवर सरासरी कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसवर होते. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी अलिबागमध्ये ३.४, डहाणूत १.६, कुलाब्यात १.५ अंश सेल्सिअसने कमाल तापमानात वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस तापमान वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा-“आतापर्यंत संघर्ष केलेल्यांसोबत काम करावे लागेल”, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; इंदापूरचे पालकत्व स्वीकारले

विदर्भात रविवार-सोमवारी गारपीट

विदर्भासह राज्यात आग्नेय दिशेने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहे. तसेच रविवारपासून अरबी समुद्रावरूनही राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. या वाऱ्याच्या संयोगातून विदर्भात रविवारी आणि सोमवारी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी, गुढीपाडव्याच्या दिवशी किनारपट्टीवगळता राज्याच्या बहुतेक भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गारपिटीचा इशारा

रविवार – वाशिम, यवतमाळ.
सोमवार – वर्धा, चंद्रपूर, अमरावती.
मंगळवार – किनारपट्टीवगळता राज्यभरात हलक्या सरींची शक्यता