पुणे : राज्यातील १८ जिल्ह्यांत पुढील चार दिवस (१७ सप्टेंबर) जोरदार पाऊस पडणार आहे. नऊ जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा नारंगी, तर नऊ जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाचा पिवळा इशारा हवामान विभागाने मंगळवारी दिला. शनिवारनंतर मात्र, पाऊस ओसरणार असल्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली.

गेले आठ दिवस राज्यात सर्वत्र दमदार पाऊस हजेरी लावत आहे. राज्यातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. काही भागातील पाऊस मंगळवारपासून ओसरला असला, तरी शनिवारपर्यंत काही भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंंबई, कोकण, मध्य महाराष्ट्राचा समावेश आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातून पाऊस ओसरण्यास सुरुवात झाली आहे.

नारंगी इशारा…

पालघर जिल्ह्यात १४ ते १६ सप्टेंबर, ठाणे, मुंबईत १५ सप्टेंबर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक जिल्ह्यांत १४ सप्टेंबर, तर पुणे जिल्ह्यात १४ आणि १५ सप्टेंबर रोजी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा नारंगी इशारा हवामान विभागाने दिला आहे. पाऊसभान… ठाणे आणि मुंबईत १४ ते १६ सप्टेंबर, रायगड जिल्ह्यात १६ आणि १७ सप्टेंबर, रत्नागिरी १५ ते १७ सप्टेंबर, सिंधुदुर्ग १४ ते १६ सप्टेंबर, नंदूरबार आणि नाशकात १५ सप्टेंबर, कोल्हापूर १५ आणि १६ सप्टेंबर, तर साताऱ्यात १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाचा पिवळा इशारा देण्यात आला आहे.

Story img Loader