पुणे : कर्जत जामखेड चे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे नेते विधान परिषद चे आमदार राम शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये मागील चार वर्षाच्या काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहण्यास मिळाले आहे. या सर्व घडामोडी दरम्यान आज रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर टीका केली आहे. जामखेड येथील नागेश्वराच्या यात्रेदरम्यान गुंड निलेश घायवळ आणि भाजपचे नेते आमदार राम शिंदे एकत्रित फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. आणखी वाचा-पुणे रेल्वे स्थानक परिसराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद या व्हिडीओ बाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, राम शिंदे यांचा निलेश घायवळ यांच्यावर वरदहस्त आहेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत निलेश घायवळ यांना पाहिले आहे. तसेच सुनेत्रा वाहिनीचा प्रचार देखील याच (निलेश घायवळ) व्यक्तीने केला होता. राजकारणामध्ये गुंडाचा वापर करून देऊ नये अशी भूमिका यापूर्वी देखील मांडली आहे. ज्या ज्या ठिकाणी गुंडाचा वापर करण्यात आला. त्या व्यक्तीना तेथील जनतेने नाकारले आहे. त्यामुळे राम शिंदेनी त्यांच्यासोबत निलेश घायवळ यांना ठेवल्यावर, आपणाला आगामी निवडणुकीत जनता त्यांच काय करेल हे कळलेच, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांना टोला लगावला.