पुणे : आषाढी वारी सोहळ्यात भाविकांचे दागिने व मोबाइल संच लांबविणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेेने अटक केली. चोरट्यांकडून २३ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह १४ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.

चांदणी शक्ती कांबळे (वय ३२), रिटा उर्फ गंगा नामदेव कांबळे (वय ३५), बबिता सूरज उपाध्ये (वय २७), पूजा धीरज कांबळे (वय ३५, सर्व रा. उदगीर, जि. लातूर), गणेश विलास जाधव (वय ३०, रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाइल संच लांबविणारा चोरटा अरबाज नौशाद शेख ( वय १९, रा. महाराजपूर, झारखंड) याच्यासह अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १४ माेबाइल संच जप्त करण्यात आले, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेेले यांना खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने सापळा लावून कांबळे, उपाध्ये, जाधव यांना पकडले. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. पालखी सोहळ्यात भाविकांकडील मोबाइल संच लांबविणारा चोरटा शेख आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४ मोबाइल संच जप्त करण्यात आले.

अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस निरीक्षक संजय पतंगे आदींनी ही कामगिरी केली

कचराकुंडीत दागिने फेकले

पोलिसांनी जेव्हा सापळा लावला. तेव्हा चोरट्यांची टोळी सोलापूरला पसार होण्याच्या तयारीत होती. त्यांच्याकडील पिशवीची झडती घेतली. तेव्हा दागिने सापडले. पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी काही दागिने कचराकुंडीत टाकले होते. पोलिसांनी कचराकुंडीत टाकलेले दागिने शोधून काढले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.