पुणे : माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली असल्याने जिल्ह्यात महायुतीला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाटील यांनी या चर्चेचे खंडन केले नसल्याने याबाबतची संदिग्धता वाढली आहे. पाटील हे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील, असा दावाही पाटील समर्थकांकडून केला जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूरच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. महायुतीमध्ये इंदापूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता असून, विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी भाजप नेत्यांवर दबाव टाकण्यासही सुरुवात केली होती. ‘इंदापूर विकास आघाडी’च्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचे संकेतही पाटील समर्थकांनी दिले होते. त्यातच वाढदिवसानिमित्त पाटील यांनी इंदापूरमधील गावांचा दौरा केला. ही जागा भाजपला मिळणार नसल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची आणि शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा >>>पिंपरी: महापालिकेचा ’कॉफी विथ कमिशनर’ उपक्रम
‘लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही चांगले असतो. मात्र, विधानसभा निवडणुकीवेळी वाईट ठरतो. गेल्या काही निवडणुकीत हाच प्रकार घडला आहे,’ अशा शब्दांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर इंदापूर येथील कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ‘जे तुमच्या मनात आहे, ते तुम्हाला बोलता येते. मला बोलण्यात अडचणी आहेत,’ असे पाटील यांनी सांगितल्याने ते अपक्ष लढणार, की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार, याबाबतची संदिग्धता कायम राहिली आहे.पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यास जिल्ह्यात आणि पर्यायाने पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.