पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात आवाजाने कमाल मर्यादा गाठली असून, सर्वत्र ध्वनिप्रदूषणाची नोंद झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठा आवाज सतत कानावर पडल्याने बहिरेपणाच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही जणांना तात्पुरत्या स्वरूपात हा त्रास जाणवत असून, काहींना दीर्घकालीन समस्या निर्माण होत आहे. यावर वेळीच उपाय न केल्यास कायमस्वरूपी बहिरेपणा येण्याचा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणात वाढ होते. डॉल्बीसह ध्वनिवर्धक आणि ढोल-ताशा पथकांचे मोठे आवाज सातत्याने नागरिकांच्या कानावर पडतात. मोठा आवाज सतत कानावर पडण्याचे कोणतेही फायदे नसले तरी दुष्परिणाम अनेक आहेत. सतत मोठा आवाज कानावर पडल्यास एका अथवा दोन्ही कानाने ऐकू न येण्याचा त्रास सुरू होतो. अशा रुग्णांची संख्या सध्या शहरात वाढल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : सायबर चोरट्यांमुळे लष्करी जवानाला मनस्ताप- ५२५ रुपयांसाठी अडीच हजार किलोमीटरचा प्रवास

याबाबत आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. वैशाली बाफना म्हणाल्या की, कोणताही मोठा आवाज कानावर पडल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात. सतत मोठा आवाज कानावर पडल्याने एकाग्रता कमी होणे, डोकेदुखी, तणाव अशा समस्या निर्माण होतात. यामुळे एखाद्या व्यक्तीच्या हातातून घरात अथवा बाहेर अपघात घडू शकतात. ढोल-ताशा अथवा फटाक्यांचा मोठा आवाज अचानक कानावर पडल्यास कर्णपटलाला छिद्र पडू शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास यातून कायमस्वरूपी बहिरेपणा येण्याचा धोका निर्माण होतो. रुग्णाने वेळेत उपचार घेतल्यास हा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो.

याबाबत कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अभिजीत मंत्री म्हणाले की, मोठा आवाज कानावर पडल्यानंतर शरीरावर अनेक परिणाम होतात. त्यात छातीत धडधड वाढणे, तणाव अशा तक्रारी वाढतात. याचबरोबर ऐकू येणे बंद होते. अनेक रुग्ण हा त्रास तात्पुरत्या स्वरूपाचा असेल असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. उपचाराला उशीर झाल्याने त्यांना कायमस्वरूपी बहिरेपणा येतो. त्यांना पुढील आयुष्य कर्णयंत्र लावून काढावे लागते. यामुळे बहिरेपणाचा त्रास होऊ लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा : सर्वकार्येषु सर्वदा : दीड शतकाच्या दस्तावेजांना आधुनिकीकरणाचा साज

बहिरेपणाचा सर्वाधिक धोका कोणाला?

  • ढोल-ताशा, डॉल्बी, डीजे अथवा ध्वनिवर्धकाच्या सातत्याने संपर्कात असलेल्या व्यक्ती.
  • सतत मोठा आवाज कानावर पडणारे औद्योगिक कामगार.
  • ईयरफोनचा सातत्याने वापर करणारे व्यक्ती.

काळजी काय घ्यावी?

  • डीजे, ढोल-ताशा यांच्या आवाजात सातत्याने राहू नका.
  • मोठा आवाज कानावर पडणार असेल तर कानात ईयरप्लग अथवा कापसाचा बोळा घाला.
  • हेडफोन अथवा ईयरफोनचा वापर मर्यादित करा.
  • हेडफोन अथवा ईयरफोन वापरापासून दर तासाला किमान ५ मिनिटांची विश्रांती घ्या.
  • गॅझेटवर आवाजाची पातळी नेहमी किमान ठेवा.

हेही वाचा : भाजप मंत्र्याच्या प्रकल्पाला अजितदादांचा खो; चाणक्य केंद्रा’च्या आरेखनात बदलाची सूचना, नावालाही आक्षेप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पिकरच्या भिंतीमुळे कानाला यंत्र

स्पिकरच्या भिंती उभारण्याचा व्यवसाय करणारा व्यावसायिकाला कायमचा बहिरेपणा आल्याचे उदाहरण डॉ. अभिजीत मंत्री यांनी दिले. ते म्हणाले की, माझ्याकडे बहिरेपणाची तक्रार घेऊन एक ४० ते ४५ वर्षीय रुग्ण आला होता. त्याचा स्पिकरच्या भिंती उभारण्याचा व्यवसाय होता. त्याला समस्या सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांनी तो माझ्याकडे आला होता. उपचारास विलंब झाल्याने त्याला कायमस्वरूपी बहिरेपणा आला. कानाला यंत्र लावून त्याला आता ऐकावे लागत आहे. त्यामुळे त्याने हा व्यवसाय बंद केला आहे.