पिंपरी : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या गर्दीत दहा जणांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला दिघी पोलिसांनी अटक केली. ही घटना शुक्रवारी सकाळी आळंदी पुणे रस्त्यावर घडली.

सिद्धार्थ संजय जाधव (वय २४, रा. शिरपूर, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने रविवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत शैलेंद्र मोहन पाटील (वय ६०, रा. कळंबोली, रायगड) यांनी दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आळंदी पुणे रस्त्यावर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी पाटील गेले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत जाधव याने पाटील यांच्या गळ्यातील नऊ लाख रुपये किंमतीची नऊ तोळ्यांची सोनसाखळी खेचली आणि घटनास्थळावरून पसार झाला. तसेच जाधव किंवा त्‍याच्‍या साथीदारांनी आणखी नऊ जणांचे सोन्‍याचे दागिनेही चोरल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.