पिंपरी : दिव्य शक्तीची आत्मभूती प्राप्त असल्याचे सांगून अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भक्तांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडून मोबाइल संचाचा ‘अ‍ॅक्सेस’ घेत खाजगी क्षण पाहणाऱ्या आणि त्यांचे चित्रीकरण करणाऱ्या एका भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली.

प्रसाद दादा ऊर्फ बाबा ऊर्फ प्रसाद भिमराव तामदार ( वय २९, रा. सुसगाव, मुळशी) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. त्याच्याविरोधात बावधन पोलीस ठाण्यात फसवणूक, विनयभंग, जादूटोणा अधिनियम आणि अ‍ॅपद्वारे गोपनीय माहितीचा गैरवापर या कलमांच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात देहूरोड येथील एका व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामदार याने घरात मठ सुरु केला होता. दिव्य शक्तीची आत्मभूती प्राप्त असल्याचे तो भासवित होता. फिर्यादीला त्यांच्या पूर्व इतिहासाची माहिती सांगितली. त्यांचा विश्वास संपादित केला. फिर्यादीचा मोबाइल घेतला. त्यांच्या परस्पर मोबाइलमध्ये ‘एअर ड्रॉईड किड’ नावाचे हिडन अ‍ॅप डाउनलोड केले. या अ‍ॅपच्या मदतीने त्याने फिर्यादीसह इतर काही व्यक्तींच्या मोबाइल ‘अ‍ॅक्टिव्हिटीवर’ नियंत्रण मिळवले.

अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांच्या नावाखाली अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. वेश्यागमन करण्याची सूचना दिली. हे सर्व तो ‘एअर ड्रॉईड किड’ या अ‍ॅपद्वारे पाहत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. मठाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादीकडून १५ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने थेट बावधन पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन बाबाला अटक केली.

असा आला प्रकार उघडकीस

एका भक्ताचा मोबाइल संच सतत गरम होऊ लागल्याने त्याने तो तपासण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या मित्राला दिला. त्या मित्राने लॅपटॉपच्या साहाय्याने मोबाइल तपासला असता त्यात हिडन अ‍ॅप सापडले. त्याच्या मदतीने मोबाइल बाहेरून कोणीतरी ऑपरेट करत असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित तरुणाने मोबाइल केवळ बाबाच्याच हातात दिल्याचे सांगितले. तरुणाने इतर काही भक्तांशी संपर्क साधला असता, त्यांच्याही मोबाइलमध्ये तेच अ‍ॅप असल्याचे निष्पन्न झाले. फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सर्व भक्तांनी एकत्र येऊन बाबाला जाब विचारला. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तामदार याने घरात मठ सुरु केला होता. दर्शन, गृहदोष दूर करण्यासाठी नागरिक त्याच्याकडे येत होते. लघुग्रह दोष असल्याचे सांगून भक्तांच्या मोबाइल संचामध्ये तो अॅप डाऊनलोड करित होता. त्याद्वारे मोबाइलचे नियंत्रण स्वत:कडे घेत होता. भक्तांना अश्लील कृत्य, महिलांशी शरीरसंबंध करण्याच्या सूचना देत होता. अॅपद्वारे तो चित्रफित पाहत होता. इतर कोणाबाबत असे कृत्य झाले असेल तर, त्यांनी बावधन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी केले आहे.