पुणे: गणेशोत्सवाला अगदी काहीच दिवस शिल्लक राहिले असून त्याची सर्वत्र तयारी पाहण्यास मिळत आहेत.तर पुणे शहरातील गणेशोत्सव पाहण्यास देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात.तर यंदा भारतीय लष्करातील ३३, १९, १, ५ आणि ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेश आणि पंजाबसह भारताच्या विविध सीमावर्ती भागात दगडूशेठ च्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रीं ची हुबेहुब २ फुटी प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले. त्यानुसार नुकत्याच या मूर्ती अरुणाचल प्रदेश, पंजाबसह विविध ठिकाणी रवाना झाल्या आहेत.

यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे.त्यामुळे मराठा बटालियनच्या प्रमुखांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची प्रतिष्ठापना सिमेवरील लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा सैनिकांच्या वतीने व्यक्त केली. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशी त्यांची मनोमन भावना होती. त्याप्रमाणे ट्रस्टकडे विनंती करणारे पत्र पाठविले होते. सलग १३ वर्षे हा उपक्रम सुरु असून बटालियनच्या संख्येत देखील वाढ होत आहे.

हेही वाचा >>>‘मोक्का’ कारवाई केलेल्या आरोपीचा येरवडा कारागृहात मृत्यू

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, सामान्य नागरिकांप्रमाणेच देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक देखील गणेशाची भक्ती करतात. मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरी करते. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूर्तीची स्थापना अनेक वर्षांपासून देशाच्या विविध सीमावर्ती भागात केली जाते. यंदा ट्रस्टतर्फे ६ मूर्ती लष्करातील मराठा बटालियनला देण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सन २०११ पासून मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती ट्रस्टचे जवळचे संबंध आहेत. सिमेवरील भारतीय लष्करी ठाण्यामध्ये गणेशाची मूर्ती स्थापन केल्याने मराठा बटालियनच्या सैनिकांना वेगळी उर्जा मिळते. तसेच या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. त्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल, अशी भावना देखील मराठा बटालियनच्या सैनिकांनी व्यक्त केली आहे.