महा-ई-सेवा आणि सेतू केंद्राच्या महाआयटी सर्व्हरमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. परिणामी या केंद्रांवरून देण्यात येणारी प्रमाणपत्रे, दाखले, कागदपत्रांची सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. कागदपत्रांशिवाय शैक्षणिक प्रवेश देखील रखडले आहेत.

राज्य सरकारच्या महाआयटी विभागामार्फत महा-ई-सेवा आणि सेतू केंद्रांच्या माध्यमातून शासकीय अनुज्ञप्ती, जात पडताळणी दाखले – प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र तसेच अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन देण्यात येतात. गेल्या आठ-दहा दिवसांपासून महाऑनलाइनच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने या सर्व केंद्रावरील कामकाज तांत्रिक कारणास्तव रखडले आहे. त्यामुळे इतर कामकाजासाठी देखील या केंद्रांवर रांगा लावल्याचे दिसून येत असून अनेक केंद्र बिघाड असल्यामुळे बंद ठेवण्यात आली आहेत.
दरम्यान, तसेच दहावी, बारावीच्या वर्गांचा निकाल जाहीर झाला असून महाविद्यालयीन प्रवेशासाठी जातीच्या प्रमाणपत्रापासून रहिवासी दाखल्यापर्यंतची सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. मात्र, महा-ई-सेवा केंद्रावरील तांत्रिक बिघाडामुळे महाविद्यालयीन प्रवेश देखील रखडल्याने विद्यार्थ्यांकडून प्रशासनाकडे तक्रारी केल्या जात आहेत. बहुतांश ठिकाणी इतर आर्थिक, वैद्यकीय कारणास्वत लागणारे उत्पन्नाचे दाखले वेळेत मिळत नसल्याने अनेक नागरिकांची कामे रखडल्याचे चित्र सध्या आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालयांकडून आवश्यकतेनुसार मागविण्यात आलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महा-ई-सेवा तसेच सेतू केंद्रांसाठी महाआयटीअंतर्गत एकच क्लाऊड सर्व्हर आहे. या क्लाऊड सर्व्हरमध्ये मोठ्या प्रमाणात विदा (डाटा) संचयित झाला आहे. परिणामी क्लाऊडमध्ये जागा (स्पेस) उपलब्ध नसल्याने जुना संचयित विदा काढण्यात आला आहे. तसेच किरकोळ तांत्रिक बिघाड दूर करून सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या आठवड्यापासून सर्व्हरला तांत्रिक अडचणी येत होत्या. ही समस्या दूर करण्यात आली असून उद्यापासून सर्व्हर पूर्ववत होऊन जलदगतीने दाखले, प्रमाणपत्रांची कामे होऊ शकतील. राज्यातील पुणे, औरंगाबाद विभागातील सेवा केंद्रांना तांत्रिक अडचणी येत आहेत. सर्व्हरवर जादा विदा (डाटा) साठविल्याने ताण येऊन तांत्रिक अडचण आली होती. हा विदा दुसऱ्या सर्व्हरवर स्थलांतरित करण्यात आला असून तो सुरक्षित आहे.- राहुल सुर्वे, राज्य व्यवस्थापक, महाआयटी