पुणे : ‘अतिवृष्टीमुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यांच्यासाठी ३१ हजार ६२७ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, राज्य सरकार एवढ्याच मदतीवर थांबणार नसून, काही बाबींचा समावेश करून आणखी मदत करणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,’ अशी स्पष्टोक्ती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी दिली.

प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृक्-श्राव्य माध्यमातून झाला. योजनेत पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यांची निवड झाली असून, त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) सभागृहात राज्यस्तरीय कार्यक्रमात कृषिमंत्री भरणे बोलत होते. आमदार बापू पठारे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनयकुमार आवटे, रफिक नायकवडी, सुनील बोरकर, अशोक किरनळ्ळी, सहसंचालक दत्तात्रय गावसाने उपस्थित होते.

भरणे म्हणाले, ‘या वर्षी जून ते सप्टेंबरपर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे जमिनींचे, घरांचे नुकसान झाले. याबाबत पंचनामे सुरू असून, राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात मदत निधी जाहीर केला आहे. त्यासाठी बागायत, जिरायत, कोरडवाहू, खरडून गेलेली जमीन या प्रकारांनुसार हेक्टरी मदत जाहीर केली आहे. तसेच, घरांची पडझड, बाधित पशुधन या नुकसानीबाबतही मदत मिळणार आहे. मात्र, वीजरोहित्र, वीजपंप, सौरपंप यांचेही मोठे नुकसान झाले असून, सरकार या बाबींचाही समावेश करणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. या सर्व बाबींचा पंचनाम्यात समावेश करून सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच हा अहवाल केंद्राकडे पाठवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत निधी दिला जाईल.’

राज्यात ३,५०० ‘कृषी सखी’

‘कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, उत्पन्नवाढीसाठी राज्यात ३,५०० ‘कृषी सखी’ काम करत आहेत. आणखी कृषी सखींनी यामध्ये सहभाग घेऊन शेतीला नवसंजीवनी द्यावी,’ असे आवाहन दत्तात्रय भरणे यांनी केले.