पुणे : निरभ्र आकाश, वातावरणात बाष्पाचा अभाव, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहणार असून, त्यानंतर ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे तापमानात वाढ होऊ शकते, असे हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळानंतर राज्यातील तापमानात झपाट्याने बदल झाला. आकाश निरभ्र होऊन वातावरणात कोरडेपणा वाढला. त्यामुळे थंडी पडण्यास सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी सातत्याने किमान तापमानात घट होत आहे.

ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस उत्तर, मध्य भारतात थंडीची लाटेची स्थिती आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच पश्चिम विदर्भातील काही ठिकाणे थंडीच्या लाटेच्या प्रभावाखाली आहेत. निरभ्र आकाश, उत्तरेकडून येणाऱ्या वातावरणामुळे रात्रीच्या तापमानात घट होत आहे.

परिणामी, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंडसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात थंडीची लाट आहे. मात्र, येऊ घातलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानात टप्प्याटप्याने वाढ होऊ शकते. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कमी झाल्यावर पुन्हा तापमानात घट होईल.

नाशिक, नंदूरबार, मालेगाव, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणीसह विदर्भात पहाटेचे तापमान सरासरीपेक्षा चार ते पाच अंश सेल्सियसने खालावत आहे. त्यामुळे या भागात थंडी टिकून आहे. सध्या जाणवत असलेल्या थंडीमध्ये १८ नोव्हेंबरपर्यंत वाढ होण्याची शक्यता जाणवते. २२ नोव्हेंबरपासून सध्याच्या तुलनेत थंडीचे प्रमाण काहीसे कमी होऊ शकेल, असे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

गोंदिया सर्वांत थंड

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी राज्यात गोंदिया येथे सर्वांत कमी, ९.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. तर पुण्यात १०.६, नाशिक येथे १०.१, अहिल्यानगर १०.३, यवतमाळ, नागपूर येथे १०.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

‘ला निना’चा प्रभाव

हवामानशास्त्रात ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ असे दोन घटक आहेत. त्यात एन निनो स्थितीमध्ये उष्ण तापमान, तर ला निना स्थितीमध्ये थंड तापमान असते. एल निनो, ला निना स्थितीचा भारतावर परिणाम होतो. या अनुषंगाने नोव्हेंबर, डिसेंबरदरम्यान तापमानात घट होण्यामागे ‘ला निना’चा प्रभाव हेही कारण असू शकते, असे कश्यपी यांनी नमूद केले.