पुणे : राज्यातील शासकीय आदिवासी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यांची रक्कम बऱ्याच वर्षांनी वाढवण्यात आली आहे. त्यानुसार निर्वाह भत्ता, साहित्य खरेदी भत्ता, आहार भत्त्याची रक्कम वाढवण्यात आली असून, शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याच्या दिनाकांपासूनच नवे दर लागू करण्यात येणार आहेत.
आदिवासी विकास विभागाने याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध केला. शासकीय आदिवासी वसतिगृहांमध्ये आठवीपासूनच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे भत्ते देण्यात येतात. भत्ता रक्कम निश्चित करून बरीच वर्षे झाली असल्याने, बऱ्याच वर्षांत भत्त्यांची रक्कम वाढवण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती, तसेच सध्याचा महागाई निर्देशांक विचारात घेऊन भत्त्यांची रक्कम २४ जून रोजी झालेल्या बैठकीत वाढवण्यासाठी मान्यता देण्यात आली.
नव्या निर्णयानुसार विभागीय स्तरावरील वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता ८०० रुपयांवरून १५०० रुपये, जिल्हास्तरावरील वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता ६०० रुपयांवरून १३०० रुपये, तालुका-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्ता ५०० रुपयांवरून एक हजार रुपये करण्यात आला आहे. साहित्य खरेदीसाठी आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ३२०० रुपयांऐवजी ४५०० रुपये, अकरावी, बारावी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना चार हजारऐवजी ५ हजार रुपये, पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ४५०० रुपयांऐवजी ५७०० रुपये, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपयांऐवजी आठ हजार रुपये देण्यात येणार आहेत. अ, ब, क महापालिका, विभागीय स्तरावरील वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा आहार भत्ता ३५०० रुपयांवरून ५ हजार रुपये, जिल्हा स्तरावरील वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा आहार भत्ता ३ हजार रुपयांवरून ५ हजार रुपये इतका वाढवण्यात आला आहे.