scorecardresearch

मोसमी पाऊस रविवारी अंदमानात; पाच दिवस आधीच दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात ‘असनी’ चक्रीवादळ शमताच कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. परिणामी नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची वाट सुकर झाली असून, दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात १५ मे रोजीच ते दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी वर्तविला.

पुणे : बंगालच्या उपसागरात ‘असनी’ चक्रीवादळ शमताच कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. परिणामी नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची वाट सुकर झाली असून, दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात १५ मे रोजीच ते दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी वर्तविला. दरवर्षी नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमानात १८ ते २० मे या कालावधीत दाखल होतात. यंदा मात्र अनुकूल स्थितीमुळे हे वारे पाच दिवस आधीच येण्याची शक्यता आहे.

  ‘असनी’ चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच बंगालच्या उपसागरात बुधवारी सायंकाळी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. या पट्टय़ाचे १२ मे रोजी तीव्र कमी दाबाच्या पट्टय़ांत रूपांतर झाल्यामुळे आंध्र प्रदेश व रायलसीमाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी होत आहे. वाऱ्यांचा वेग किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किलोमीटर आहे. या सर्व घडामोडींमुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन सुकर होण्यास मदत झाली आहे. यामुळे यंदा हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजापेक्षाही पाच दिवस आधीच र्नैऋत्य मोसमी वारे या भागात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या अनुकूल स्थितीमुळे तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, लक्षद्वीप यासह ईशान्य भागातील नागालॅण्ड, मिझोराम, त्रिपुरा या भागांतही पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली, महाराष्ट्रातील विदर्भ या भागांत १६ मेपर्यंत उष्णतेची तीव्रता कायम राहणार आहे.

ढगाळ हवामानामुळे पिकांची काळजी :

‘असनी’ चक्रीवादळामुळे हवामान विभागाने आंध्र प्रदेशातील तीन जिल्ह्यांना लाल इशारा दिला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांत होणार आहे. चक्रीवादळामुळे राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या काही भागांत ढगाळ वातावरण राहणार आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगलीतही ढगाळ वातावरण राहणार असून, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांबाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

२७ मे ते २ जूनपर्यंत तळकोकणात

नैर्ऋत्य मोसमी वारे केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत दाखल होतील़ तळकोकणात ते २७ मे ते २ जूनपर्यंत दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली. अंदमानात पाच दिवस आधी मोसमी वारे दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई परिसरात ढगाळ वातावरण

मुंबई आणि परिसरात साधारणत: गेल्या आठवडय़ापासून कमाल तापमान सरासरीप्रमाणेच आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळामुळे मुंबई आणि परिसरात गुरुवारी ढगाळ वातावरण होते. पुढील काही दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विभागाच्या सांताक्रूझ केंद्राने गुरुवारी सरासरी ३४0 ५ अंश सेल्सिअस कमाल, तर २८0 २ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली. कुलाबा केंद्राने सरासरी ३३0 २ कमाल तर २७0 ६ किमान तापमानाची नोंद केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Monsoon rains andamans sunday meteorological department forecasts arrive advance ysh

ताज्या बातम्या