मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वेगाला बसणार वेसण; वाहनचालकांना वेग समजण्यासाठी दोन ठिकाणी फलक|mumbai bangloare bypass route control speed digital board police rto navale bridge pune | Loksatta

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वेगाला बसणार वेसण; वाहनचालकांना वेग समजण्यासाठी दोन ठिकाणी लावण्यात येणार फलक

बाह्यवळण मार्गावर झालेल्या अपघातानंतर पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा प्रशासनाकडून दीर्घकालीन कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

mumbai bangloare bypass route control speed digital board police rto navale bridge pune
संग्रहित छायाचित्र /लोकसत्ता

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावर रविवारी रात्री भरधाव ट्रकने ४८ वाहनांना धडक दिल्याच्या घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी वेगाला वेसण घालण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बाह्यवळण मार्गावर बहुतांश अपघात भरधाव वेगामुळे झाल्याने वाहनचालकांना वेगमर्यादेबाबतची माहिती देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नवीन कात्रज बोगदा आणि नवले पूल येथे डिजिटल फलक (स्पीड डिटेक्शन फलक) बसविण्यात येणार आहेत. या फलकांद्वारे वाहनचालकांना त्यांच्या वाहनाचा वेग किती आहे, याची माहिती समजणार आहे.

बाह्यवळण मार्गावर झालेल्या अपघातानंतर पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा प्रशासनाकडून दीर्घकालीन कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी बाह्यवळण मार्गाची पाहणी केली असून त्याबाबतचा अहवाल पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना सादर करण्यात येणार आहे. बहुतांश अपघात भरधाव वेगामुळे झाले आहेत. नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यान असलेल्या तीव्र उतारावर वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होत असल्याने पोलिसांकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

हेही वाचा: नवले पूलावरील अपघात ब्रेक निकामी झाल्यामुळे नाही; ‘आरटीओ’चा अहवाल पोलिसांना सादर

नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यान तीव्र उतार आहेत. या भागात दोन ठिकाणी वाहनांचा वेग नेमका किती आहे, याची माहिती देणारे दोन फलक (स्पीड डिटेक्शन बोर्ड) लावण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्यांच्या वाहनाचा वेग किती आहे, याची माहिती समजणार आहे. या फलकामुळे वेग नियंत्रण शक्य होणार असल्याचे मगर यांनी नमूद केले.

हेही वाचा: पुणे विद्यापीठात गणेश अथर्वशीर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

नवीन कात्रज बोगदा परिसरात ध्वनिवर्धक यंत्रणा
नवीन कात्रज बोगदा संपल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून चाैकी बांधण्यात येणार आहे. तेथे ध्वनिवर्धक लावण्यात येणार असून वाहनचालकांना वेग कमी ठेवण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. या भागात पोलीस बंदोबस्त तसेच पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार आहे. उतारावर वाहनचालकांनी न्यूट्रल स्थितीत वाहन चालवू नये, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. जागोजागी छोट्या गतिरोधक पट्ट्या (रम्बलिंग स्ट्रीप) लावण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटाप्रमाणे बाह्यवळण मार्गावर क्रेन ठेवण्यात येणार आहे. अपघात घडल्यास क्रेनच्या सहायाने वाहन त्वरित बाजूला काढून रस्ता वाहतुकीस मोकळा केला जाणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 09:42 IST
Next Story
नवले पूलावरील अपघात ब्रेक निकामी झाल्यामुळे नाही; ‘आरटीओ’चा अहवाल पोलिसांना सादर