पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर शनिवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व डी.वाय.पाटील लोहगाव येथील विद्यार्थी असून ते लोणावळा येथे फिरण्यासाठी जात होते.

चालक हर्ष वर्धनता वय (२०), पार्थ गोगिया (२०), नितिन सिंग चौधरी वय (१९), अनिशा जैन वय (१९), ब्रिजल पालेजा वय (१९), आदित्य सिंग वय (१९) अशी जखमी झालेल्या तरुणांची नाव आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील डी.वाय पाटील मधील सहा विद्यार्थी हे आज पहाटे मोटारीने लोणावळ्याला फिरण्यासाठी जात होते. तेव्हा, भरधाव वेगात असलेल्या मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार द्रुतगतिमार्गावर पत्र्याच्या सुरक्षा कठड्यावर जोरात जाऊन आदळली.

हा अपघात एवढा भीषण होता की, सुरक्षा कठड्याचा पत्रा मोटारीत शिरला आहे. यात मोठ्या प्रमाणावर मोटारीचे नुकसान झाले असून अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. सहापैकी  तीन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोटारीत चार मुले आणि दोन मुली होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.