पुणे : कात्रज, सिंहगड रस्ता, वडगाव, धायरी तसेच कोंढवा भागात आठवड्यातून एक दिवस लादण्यात आलेली पाणीकपात मंगळवारी दुसऱ्याच दिवशी महापालिका प्रशासनाने मागे घेतली. आजपासून (बुधवार) या सर्व भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.
वडगाव बुद्रुक येथील पाण्याच्या टाकीवरून ज्या भागांना पाणी दिले जाते, त्या भागांमधील पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला होता. सोमवारपासून याची अंमलबजावणीदेखील सुरू करण्यात आली होती. मात्र, केवळ दक्षिण पुण्यातील नागरिकांवर लादण्यात आलेल्या या पाणीकपातीला नागरिकांकडून तसेच राजकीय पक्षांकडून विरोध केला जात होता. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठ्याचा आढावा घेऊन पाणीकपात तत्काळ रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला दिले होते.
पाणीकपात सुरू करण्यात आलेल्या भागातील नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. महापालिका आयुक्तांशी चर्चा करून सध्या उपलब्ध पाणीसाठा, पाणीवापर याचा आढावा घेऊन पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नंदकिशोर जगताप पाणीपुरवठा विभाग प्रमुख, पुणे महापालिका