पिंपरी : महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चार सदस्यीय प्रभाग पद्धती अनुकूल असल्याने भाजपने स्वबळावर लढण्याचा नारा देऊन शंभर नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षानेही स्वबळावर लढण्याची तयारी असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुतीमधील दोन पक्षांचा स्वबळावर लढण्याचा सूर आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मात्र एकत्रित लढण्याकडे कल आहे.
सन २०१७ ची निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने झाली होती. त्याचा मोठा फायदा भाजपला झाला. महापालिकेवर पहिल्यांदाच कमळ फुलले. तर, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसला चार सदस्यीय पद्धतीचा फटका बसला. आताही प्रभाग रचनेचे आदेश येताच भाजपने कामाला सुरुवात केली आहे. आमदार आणि माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये संभाव्य प्रभाग रचना, पुढील रणनीतीबाबत चर्चा झाली. या कार्यशाळेत शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह चारही आमदारांनी स्वबळाचा नारा दिला. शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही हा बालेकिल्ला पुन्हा खेचून आणायचा आहे. त्यासाठी या पक्षानेही स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केली आहे. त्या दृष्टीने तयारी केली जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभेला तिन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवडणूक लढविली. पण, अपयश आले. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पुन्हा लक्ष घातले आहे. पवार १७ जून रोजी ताथवडे येथे येणार आहेत. तेव्हा महापालिका निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
भाजपकडे एकेका जागेसाठी दोन ते तीन सक्षम उमेदवार आहेत. जुन्या-नव्यांचा समतोल साधून युवा कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. स्वबळावर लढून शंभर नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट आहे. स्वबळावर लढावे अशी सर्वांची भावना असून, अंतिम निर्णय पक्षनेतृत्व घेईल.– शत्रुघ्न काटे,शहराध्यक्ष, भाजप
‘राष्ट्रवादी’ चार वेळा स्वबळावर निवडणूक लढली आहे. आताही स्वबळावर लढण्याची तयारी आहे. स्वबळावर लढलो, तरी मित्र पक्षांवर टीका केली जाणार नाही. मैत्रीपूर्ण लढत होईल. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील.- योगेश बहलशहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
युवा सेना, शाखा प्रमुखांच्या बैठका सुरू आहेत. महायुतीमधून निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे. महायुतीने एकत्र निवडणूक लढल्यास योग्य होईल.– नीलेश तरसशहरप्रमुख, शिवसेना (शिंदे)
महाविकास आघाडी म्हणून आणि स्वतंत्र, अशा दोन्ही पद्धतींनी लढण्याची तयारी आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. एकत्रित लढण्याबाबतचा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार घेणार आहेत.– तुषार कामठेशहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
पक्षाच्या विधानसभानिहाय बैठका सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी सक्षम उमेदवार असून काही ठिकाणी नाहीत. महाविकास आघाडीने एकत्रित लढल्यास फायदा होईल. एकत्रित लढण्याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील.- संजोग वाघेरेशहरप्रमुख, शिवसेना (ठाकरे)
काँग्रेसची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. स्वतंत्र लढण्याचा आग्रह नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी.- कैलास कदमशहराध्यक्ष, काँग्रेस