बारामती / जेजुरी : ‘पुरंदरमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी राज्य सरकारने भूसंपादनाची कार्यवाही सुरू केली आहे. त्यात भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही. प्रत्येकाला विश्वासात घेऊन प्रकल्प पूर्ण केला जाईल,’ अशी ग्वाही केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी दिली.

बारामती येथे पंतप्रधान किसान सन्मान निधीचे वाटप मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी जेजुरीच्या खंडोबा गडावर अभिषेक आणि महापूजा केली. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले, ‘पुरंदर येथे विमानतळाची अत्यंत आवश्यकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी विमानतळासाठी भूसंपादनाचा निर्णय घेतला आहे.

देशात कोठेही विमानतळ करायचे असेल, तर राज्य सरकारला जागा द्यावी लागते. त्याप्रमाणे राज्य सरकार भूसंपादन करील. ते करताना कोणत्याही भूमिपुत्रावर, शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊनच भूसंपादन होईल. शेतकऱ्यांशी योग्य समन्वय साधण्याचे काम येथील लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे. सर्वांना विश्वासात घेणे महत्त्वाचे आहे.’

बारामती येथील कार्यक्रमात मोहोळ म्हणाले, ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०१९ पासून सुरू करण्यात आली आहे. देशभरात २०० पेक्षा अधिक ठिकाणी हा कार्यक्रम झाला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये आणि राज्य सरकार नऊ हजार रुपये असे १५ हजार रुपये जमा करत आहे. काँग्रेस सरकारच्या काळात हे होत नव्हते. काँग्रेसच्या काळात सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपया दिला, तर ८५ पैसे कुठे जात होते, ते समजत नव्हते. आता मोदी सरकारच्या काळात रुपया असला, तरी तो लाभार्थ्याच्या खात्यात जमा होत आहे.’

पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या घरी भेटी

मुरलीधर मोहोळ यांनी या दौऱ्यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी, कार्यालयात भेटी दिल्या. निरा येथे भाजप कार्यकर्ते संजय निगडे यांच्या घरी, तर माळेगाव येथे रंजन तावरे यांच्या कार्यालयात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर जेजुरी येथे भाजपचे शहराध्यक्ष सचिन पेशवे यांच्या घरी भोजन केले. भाजपमध्ये प्रवेश केलेले पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप मोहोळ यांच्या दौऱ्यात सहभागी होते.

जगताप यांच्या सासवड येथील घरी माेहोळ यांनी भेट दिली. या वेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष साकेत जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, तसेच जालिंदर कामठे, रंजन तावरे, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे, खंडोबा देवस्थानाचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, ॲड. पांडुरंग थोरवे, ॲड. विश्वास पानसे, गिरीश जगताप, भाजप शहराध्यक्ष सचिन पेशवे, अलका शिंदे, सचिन सोनवणे आदी उपस्थित होते.