गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत नैसर्गिक शेती विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सहा ऑक्टोबर रोजी बालेवाडी क्रीडा संंकुलात होणार आहे. कार्यशाळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आदी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा >>> पुणे जिल्ह्यात २८ जणांना नव्याने करोना संसर्ग

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी हरियानातील कुरुक्षेत्र येथील गुरुकुलात सुमारे दोनशे एकर जागेत नैसर्गिक शेतीचे प्रयोग केले आहेत. भविष्यात नैसर्गिक शेती हाच शाश्वत शेतीचा पर्याय कसा होऊ शकतो, या बद्दल राज्यपाल मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेला राज्यभरातून दोन हजार शेतकरी उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या युट्यूब वाहिनीवर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची सोय ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालये, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी संशोधन संस्थांमधून केले जाणार आहे. कार्यशाळेत नैसर्गिक शेती, जैविक शेती, सेंद्रिय आणि रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यशाळेचा लाभ जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.