बारामती : ‘ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे पक्षाचे सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्याबाबत आमदार गोपीचंद पडळकर चुकीचे बोलले. ही आपली संस्कृती नाही,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी केली.

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या नवीन कार्यकारिणीचा सत्कार आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पडळकर यांच्यावर टीका केली. बैठकीला जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे उपस्थित होते.

युगेंद्र पवार म्हणाले, ‘आपल्यापेक्षा कर्तृत्वाने, वयाने मोठे असतात, त्यांच्याबाबत असे बोलायचे नाही, ही आपली संस्कृती आहे. मात्र, पडळकर चुकीचे बोलले.’ ‘आगामी निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतचोरीपासून सावध राहावे. देशात सगळीकडे मतचोरी सुरू आहे. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचून चांगले कार्यकर्ते तयार करा. लोकांचे म्हणणे आणि त्यांच्या समस्या काय आहेत, ते जाणून घ्या,’ असे आवाहनही त्यांनी केले.

‘मला कशाला अडचणीत आणता?’

आमदार रोहित पवार यांनी आमसभेमध्ये अधिकाऱ्याला उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केल्याबाबत विचारणा करण्यात आली असता, युगेंद्र पवार म्हणाले, ‘मला कशाला अडचणीत आणता? तो प्रश्न रोहित पवार यांनाच विचारा.’