मोठा गाजावाजा करत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेस संघटनेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवड बालेकिल्ल्यातच अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. रडतखडत प्रवास व बऱ्याच नाटय़मय घडामोडी झाल्यानंतर उशिरा का होईना तीन पदाधिकारी जाहीर करण्यास मुहूर्त सापडला आहे.
राष्ट्रवादी युवतीच्या जिल्हा संघटकपदी वर्षां जगताप (संत तुकारामनगर), सहसंघटक अर्चना भालेराव (थेरगाव) व प्रियांका लोंढे (भोसरी) यांची निवड करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे पिंपरी शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केली. उर्वरित कार्यकारिणी लवकरच जाहीर करू तसेच अजितदादा व सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत युवतींचा मेळावा घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी युवतीची स्थापना १० जून २०१२ मध्ये झाली. तालुका, नगरपालिका व महापालिका स्तरावर संघटना बांधणीचे काम हाती घेत राष्ट्रवादीने सदस्य नोंदणीचे अभियान सुरू केले. संघटनेची रचना व निवड प्रक्रियेसाठी काही निकष ठरवून १८ ते ३० वयोगटातील युवतींची नावे, पत्ता, शिक्षण, दूरध्वनी, ई मेल, जन्मतारीख आदी माहितीची नोंद ठेवण्याचे आवाहन पक्षाने केले. सुळे यांच्या मेळाव्यांना युवतींकडून जोरदार प्रतिसाद मिळत असताना अपेक्षित नोंदणी होत नव्हती, पिंपरी-चिंचवडही त्याला अपवाद नव्हते. तेव्हा अजितदादांनी राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, सेलचे पदाधिकारी, महापौर, नगराध्यक्ष, तालुकाध्यक्षांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. पिंपरीत नोंदणीला थंडा प्रतिसाद होता. नोंदणीसाठी पक्षाचे नगरसेवक उत्साही नव्हते. शहराध्यक्ष बहल यांनी पत्र देऊन, दूरध्वनी करून तसेच सतत एसएमएस पाठवूनही कसलीच दाद मिळत नव्हती. मात्र, अजितदादांच्या त्या खरमरीत पत्रामुळे काही प्रमाणात सूत्रे हलली. मात्र, तरीही नोंदणीचा प्रवास रडतखडतच सुरू होता. अखेर, सहा महिन्यांनंतर आता तीन पदाधिकारी जाहीर करून सुरूवात झाली आहे.