पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या नीलेश चव्हाणची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश शनिवारी न्यायालयाने दिले. वैष्णवीची सासू लता, नणंद करिष्मा, पती शशांक यांचे मोबाइल संच चव्हाणकडून जप्त करण्यात आले. चव्हाण आणि आरोपींमध्ये झालेले संभाषण, तसेच संदेशाची तांत्रिक तपासणी करण्यात आली असून, पोलिसांकडून तांत्रिक पुरावे संकलित करण्यात आले आहेत.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), दीर सुशील (वय २७), पती शशांक (वय २७), सासू लता (वय ५४), नणंद करिष्मा (वय ३१) यांना न्यायालयाने यापूर्वी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर चव्हाण याला शनिवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चव्हाणने वैष्णवीच्या बाळाशी गैरवर्तणूक केली आहे का, नीलेश आणि अन्य आरोपींमध्ये नेमके काय संभाषण झाले, चव्हाण आणि हगवणे कुटुंबातील सदस्यांत आर्थिक व्यवहार झाले आहेत का, या दृष्टीने तपास करण्यात आला आहे. चव्हाणला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावे, असा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला. बचाव पक्षाकडून ॲड. स्वानंद गोविंदवार यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने चव्हाणला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.