पुणे : विश्वविख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठात पहिल्यांदाच मराठी भाषेचे धडे दिले जाणार आहेत. विद्यापीठातील आशियाई आणि मध्यपूर्व अभ्यास विभागाने मराठी भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून, या अभ्यासक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मराठी शिकण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा >>> Flight Receives Bomb Threat : २४ तासांत ८० अफवा; नऊ दिवसांत विमान कंपन्यांना ६०० कोटींचे नुकसान

विद्यापीठात हिंदीचे अध्यापन करणाऱ्या प्रा. अश्विनी मोकाशी यांच्याशी संवाद साधून मराठी भाषा अभ्यासक्रमाबाबत ‘लोकसत्ता’ने माहिती जाणून घेतली. प्रा. मोकाशी म्हणाल्या, की मी गेल्या वर्षीपासून हिंदी शिकवायला सुरुवात केली आणि माझी मराठी शिकवण्याची आवडही व्यक्त केली होती. गेल्या शैक्षणिक वर्षात मला विद्यापीठातील एका वाचन गटाला संत बहिणाबाईंची गाथा या १७व्या शतकातील ग्रंथाबाबत मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. तेव्हा आम्ही विद्यापीठात मराठी शिकवण्याचा विचार मांडला होता. सुदैवाने या वर्षी काही विद्यार्थ्यांना हिंदी व्यतिरिक्त दुसरी भारतीय भाषा शिकायची होती आणि त्यांना मराठी शिकण्यात रस होता. त्यामुळे आम्ही मराठीचा अभ्यासक्रम शिकविण्याचा निर्णय घेतला. या पूर्वी कधी ऑक्सफर्ड विद्यापीठात मराठी भाषा शिकवली गेलेली नाही. आशियाई आणि मध्यपूर्व अभ्यास विभागात सुमारे १३० विद्यार्थी आहेत. या विभागात जगभरातून विद्यार्थी येतात.

अभ्यासक्रमात काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठी भाषा अभ्यासक्रमात विद्यार्थी प्राथमिक पातळीवर शैक्षणिक मराठी शिकतील. देवनागरी लिपीपासून सुरुवात होऊन व्याकरण, शब्दसंग्रह, वाचन, ऐकण्याचा आणि बोलण्याचा सराव करतील. या वर्षाअखेरीस ते सोपे मराठी बोलायला आणि लिहायला शिकतील. तसेच गद्या आणि पद्या वाचन करू शकतील. माझ्या माहिती प्रमाणे इंग्लंडमध्ये मराठी भाषेचा अन्य अभ्यासक्रम सुरू नाही. परंतु बऱ्याच वर्षांपूर्वी लंडनला स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (एसओएएस) या महाविद्यालयात मराठी अभ्यासक्रम सुरू होता, असे प्रा. मोकाशी यांनी सांगितले.