हो, पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीसांवर नाराज; रामदास आठवले यांचा गौप्यस्फोट

राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करतात.

“पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाल्या आहेत. त्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मात्र, चर्चेतून ती नाराजी लवकरच दूर होईल.”, असा गौप्यस्फोट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे रामदास आठवले यांच्या हस्ते सुपूर्द केल्यानंतर, तसेच उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या कार्यालयास भेट दिल्यानंतर आठवले पत्रकारांशी बोलत होते.

“जातीनिहाय जनगणना करण्याबाबत मी सकारात्मक असून, त्यातून अनेक जातींना आरक्षण नेमके कसे द्यावे, हे निश्चित करणे सोयीचे होईल व सर्वाना न्याय देता येईल. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी राज्याला अधिकार द्यावेत, कायद्यात बदल करावेत. ओबीसींच्या २५ टक्केमध्ये वर्गावारी करून, प्रत्येकास ९ टक्के आरक्षण द्यावे, कोणत्या जाती कोणत्या गटात टाकावेत याचा विचार करावा. आर्थिक दुर्बलांना १० टक्के शिक्षण आणि नोकरीचे आरक्षण मिळेल,” असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

हेही वाचा- “राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक”, प्रविण दरेकरांनी राज्य सरकारला सुनावले!

शिवसेनेने पुन्हा भाजपासोबत युती करावी

“राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करतात. आगामी निवडणुकांत राजकीय नुकसान टाळायचे असेल, तर शिवसेनेने पुन्हा भाजपासोबत युती करण्याची आवश्यकता आहे. भाजप व रिपब्लिकन पक्ष एकत्र असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता येणे अवघड आहे. त्यामुळे शिवसेनेने आमच्यासोबत आले पाहिजे,” असे आठवले म्हणाले.

मी आता ‘नो करोना नो’ म्हणतो

रामदास आठवले म्हणाले, “पुण्याचा विस्तार होत असून, ४० लाखाच्या पुढे लोकसंख्या गेली आहे. त्यामुळे पालिकेचे विभाजन करून दोन पालिका अस्तित्वात यायला हव्यात. पुण्याच्या विकासासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करेन. ‘गो करोना गो’ म्हणत होतो. मात्र, मलाच करोना झाल्याने मी आता ‘नो करोना नो’ म्हणतो. करोनाची परिस्थिती हाताळताना पुण्याचे महापौर, उपमहापौर व पालिका प्रशासनाने चांगली कामगिरी केली आहे. मोठ्या प्रमाणात योजना आखल्या. बेड, ऑक्सिजन, औषधे मिळवून दिले, रुग्णालय उभे केले. आता तिसरी लाट आली, तरी सक्षम यंत्रणा उभी केली आहे. राज्यांना मदत गेली आहे, मुख्यमंत्र्यांसोबत बैठका झाल्या. त्यामुळे तिसऱ्या लाटेवर आपण मात करू शकतो.”

भविष्यातही भाजपसोबतच राहणार

“रिपब्लिकन पक्षाचे आता पालिकेत पाच नगरसेवक आहेत. तीन उपमहापौर झाले आहेत. स्वबळावर निवडणूक लढून हे यश मिळवणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही भविष्यातही भाजपसोबतच राहणार असून, नगरसेवकांची संख्या वाढवणार आहोत. विधानसभेलाही आम्हाला भाजपच्या साथीने चांगल्या जागा मिळतील,” असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pankaja munde angry with devendra fadnavis ramdas athavale assassination srk