महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी ४५ जणांची निवड बुधवारी (१३ मे) केली जाणार असून या निवडीबाबत राजकीय समीकरणे जुळत असल्यामुळे निवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी जाहीर केली. त्यामुळे मनसे-राष्ट्रवादी यांची युती होण्याऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची या निवडणुकीसाठी आघाडी होण्याची शक्यता आहे.
महापालिकेची १५ क्षेत्रीय कार्यालये असून प्रत्येक कार्यालयात तीन या प्रमाणे ४५ सदस्य क्षेत्रीय कार्यालयांवर स्वीकृत होणार आहेत. या पदांसाठी २६१ जणांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी त्या त्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जे नगरसेवक आहेत ते मतदान करतील.
‘संस्थांच्या प्रतिनिधींवर अन्याय’
या निवडणुकीबाबतची पक्षाची अधिकृत भूमिका मनसेचे महापालिकेतील गटनेता राजेंद्र वागसकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. स्वीकृत सदस्य या पदांवर सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी निवडून जाणे अपेक्षित होते. परंतु सर्व १५ प्रभाग समित्यांमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणात अर्ज केले आहेत. कायद्याची पळवाट करून राजकीय लोक या पदांवर निवडून जाणार आहेत. सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींवर हा एक प्रकारचा अन्याय आहे. त्यामुळे मनसे या निवडणुकीत भाग घेणार नाही, असे वागसकर यांनी सांगितले. पुणे महापालिकेत मनसेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कुठल्याही प्रकारची युती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी निवडणुकीबद्दल चर्चा झाली आणि त्यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, असेही वागसकर यांनी सांगितले.
राष्ट्रवादी आणि मनसेची युती होण्याची चर्चा होती. मात्र ही युती होणार नसल्यामुळे आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होईल, अशी शक्यता आहे.