राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून असाच पाऊस पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या खडकवासला धरण साखळीत देखील जोरदार पाऊस सुरू आहे. तर मागील चोवीस तासांत पाच टीएमसी एवढा पाऊस झाला आहे. यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात २ हजार ५५३ इतका सुरू असल्याचे पाटबंधारे विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
पुणे शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला, या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या धरणात क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. चारही धरणात मागील चोवीस तासापूर्वी १४.१३ टीएमसी आणि ४८.८४ टक्के इतका साठा होता. तर आज सकाळी धरणसाठ्यात १८.१२ टीएमसी आणि ६२.१७ टक्के इतका साठा उपलब्ध आहे. तसेच जोरदार पावसामुळे काल ४ हजाराहून अधिक विसर्ग दुपारी सोडण्यास सुरुवात केली. तोच विसर्ग मध्यरात्री १८ हजार ४९१ वर गेला होता. मात्र आज सकाळच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाल्याने, सध्य स्थितीला २ हजार ५५३ विसर्ग सोडण्यात येत आहे.
त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणि नदी पात्रातील विसर्ग मिळून, मागील चोवीस तासात ५ टीएमसी पाऊस झाल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच पुणे शहराला वर्षभरासाठी १८ टीएमसी पाणी आवश्यक असते आणि आजचा धरणातील साठा लक्षात घेता पुणे शहराची वर्षभराची चिंता मिटली आहे. यामुळे पुणेकर नागरिकांवरील पाणी संकट टळले असल्याचे सांगितले जात आहे.