पुणे : शहरातील समस्या सुटत नसल्याने पुणेकरांचे जीवन बिकट झाल्याच्या भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्याचे शहर काँग्रेसमधील नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. ‘राज्यासह केंद्रात सत्ताधारी असतानाही खासदार कुलकर्णी यांनी जाहीरपणे भूमिका मांडल्याने त्यांचे कौतुक करून, विकासाची भाषा आता भाजपने बंद करावी,’ अशी टीकाही केली.
‘शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, वाहतुकीची कोंडी, कचऱ्याचा प्रश्न यामुळे शहर राहण्यास योग्य राहिले नाही. या समस्यांमुळे पुणेकरांचे जीवन बिकट असल्याची भूमिका भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी मांडली. ही भूमिका घेत खासदार कुलकर्णी यांनी शहराच्या विकासाची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांना घरचा आहेर दिला आहे,’ अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.
‘गेल्या दहा वर्षांत पुण्याचा विकास शून्य झाल्याची कबुली खासदार कुलकर्णी यांनी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या दिशाहीन आणि निष्क्रिय कारभारावर विरोधी पक्षांनी टीका करायची गरज उरलेली नाही,’ असेही जोशी म्हणाले.
काँग्रेसचे शिवा मंत्री म्हणाले, ‘केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असतानाही नागरिकांचे जीवन बिकट झाले आहे, याचा अर्थ भाजप पुणेकरांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहत नाही. सर्वसामान्यांच्या मनात असलेली भावना खासदार कुलकर्णी यांनी व्यक्त केली असून, पुढील काळातही पुणेकर नागरिकांच्या हितासाठी त्यांनी या भूमिकेवर ठाम राहावे.’