पुणे : पाच वर्षांची मुदतवाढ घेतल्यानंतर आता दशकभरानंतर लोकशाही मार्गाने महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) या आद्य साहित्य संस्थेच्या कार्यकारिणीची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. परिषदेमध्ये शनिवारी (२७ सप्टेंबर) होत असलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये निवडणुकीची औपचारिक घोषणा होणार असून, १५ मार्चपर्यंत नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येईल.

निवडणूक झालीच, तर सातारा येथील ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडल्यानंतरच प्रत्यक्ष प्रचाराचा धुरळा उडेल. कार्यकारिणीच्या ३३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला उभे राहू इच्छिणाऱ्यांसाठी परिषदेच्या नव्या घटनेनुसार किमान ७५ वर्षे वयाची मर्यादा असल्याने विद्यमान कार्यकारिणीतील किमान दहाजण पात्र ठरणार नाहीत.

प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली २०१६ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची कार्यकारिणी अस्तित्वात आली होती. परिषदेच्या घटनेनुसार पाच वर्षांच्या मुदतीनंतर निवडणूक घेणे अपेक्षित होते. मात्र, करोनाचे निमित्त पुढे करून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बहुमताच्या जोरावर विद्यमान कार्यकारिणीला पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. या मुदतवाढीला धर्मादाय आयुक्तांकडे आव्हानही देण्यात आले असून, त्यावरील सुनावणी सुरूच आहे.

मुदतवाढीला आक्षेप घेणाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही गाऱ्हाणे मांडले. परिषदेच्या कार्यकारिणीची ही मुदतवाढ ३१ मार्च रोजी संपुष्टात येत असल्याने आता लोकशाही मार्गाने परिषदेची निवडणूक घेण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतला आहे. डाॅ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (२७ सप्टेंबर) होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणुकीचा प्रस्ताव मांडून त्यास सभेची मान्यता घेण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला जाणार असल्याची शक्यता आहे, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

आधी संमेलनाचे दिव्य

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय पुढील तीन वर्षांसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. त्यानुसार आगामी तीन साहित्य संमेलनांचे आयोजन करण्याचे अधिकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडे आले आहेत. जानेवारीमध्ये सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. मात्र, हे संमेलन पार पडल्यानंतरच निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उडणार असल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली.

असे आहे परिषदेचे कार्यक्षेत्र

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग

  • अस्तित्वात असलेल्या शाखांची संख्या – ९५
  • आजीव सभासदांची संख्या – सुमारे १७ हजार ५००

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नव्या घटनेनुसार ही निवडणूक होणार असून, पंचाहत्तरी पार व्यक्तीला निवडणुकीमध्ये उभे राहता येणार नाही. साहित्य क्षेत्रात योगदान असलेल्या ज्येष्ठ साहित्यिकाला अध्यक्षपदाचा बहुमान दिला जात असे. कार्याध्यक्ष हे दैनंदिन कामकाजाचे प्रमुख असत. मात्र, नव्या घटनेनुसार कार्याध्यक्ष पद गोठविण्यात आले असून, कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष ही तीन पदे प्रमुख असणार आहेत. – सुनीताराजे पवार, प्रमुख कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद