पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर कारागृहातून जामीन मिळवून बाहेर आलेल्या गुंडाकडून स्वारगेट पोलिसांनी पिस्तूल जप्त केले. सारसबाग परिसरात ही कारवाई केली.

नरेश उर्फ नब्या सचिन दिवटे (वय २२, रा. सर्व्हे क्रमांक १३३, दांडेकर पूल) असे् अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दिवटे याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आली होती. दिवटे हा कारागृहात होता. कारागृहात असताना त्याने न्यायालयाकडून जामीन मिळविला. त्यानंतर तो कारागृहातून बाहेर आला. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस हवालदार कुंदन शिंदे आणि दिनेश भांदुर्गे हे सारसबाग परिसरात गस्त घालत होते.

त्या वेळी दिवटे हा आदमबागेजवळील रस्त्यावर थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती शिंदे आणि भांदुर्गे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्या कंबरेला पिस्तूल खोचल्याचे आढळून आले. दिवटे याच्याकडून पिस्तुलासह एक काडतूस जप्त करण्यात आले. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवटे याच्याविरुद्ध सहकारनगर आणि पर्वती पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दंगल, गंभीर दुखापत, लूटमार, तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन वर्षांपूर्वी त्याच्याविरुद्ध मकोका कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत कारागृहातून तो जामीन मिळवून बाहेर आला. त्याचा पिस्तूल बाळगण्याचा उद्देश काय ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. न्यायालायने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक भारमळ, सहायक निरीक्षक अभिजित पाटील, उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, संजय भापकर, कुंदन शिंदे, दिनेश भांदुर्गे, श्रीधर पाटील, सागर केकाण, राहुल तांबे, विक्रम सावंत, रमेश चव्हाण, विकास केद्रे यांनी ही कारवाई केली.