scorecardresearch

Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणे प्रारूप : समृद्ध आर्थिक शक्तिस्थळ निर्माणाचे धडे

Loksatta Pune Vardhapan Divas 2023 : व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी पुण्याने आपले शासन आणि प्रशासन सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

Pune Model Lessons for Building a Prosperous Economic Powerhouse
समृद्ध आर्थिक शक्तिस्थळ निर्माणाचे धडे

डॉ. सुधीर मेहता

पायाभूत सुविधा हा शहराची वाढ, विकासाचा कणा असतो. वाढती लोकसंख्या, आर्थिक हालचालींसोबत वेग राखण्यासाठी त्यात सुधारणा झाली पाहिजे. वेगवान वाहतूक व्यवस्था, सोबतच रस्ते, पूल, सार्वजनिक वाहतूक आणि विमानतळं शहराच्या वाढीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात. त्याशिवाय पुण्याने औद्योगिक क्षेत्रं, परिषद केंद्र आणि बिझनेस पार्कच्या प्रगतीसाठी गुंतवणूक केली पाहिजे, जेणेकरून नोकऱ्यांच्या संधी निर्माण होऊन आर्थिक वृद्धीला हातभार लागेल. शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेतही सुधारणा झाली पाहिजे. कारण औद्योगिक आणि निवासी परिसर वृद्धीच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : भविष्यातील सर्वोत्तम शहर

उदयोन्मुख आणि विकसनशील आशियाच्या एकूण वृद्धीला धोबीपछाड देत भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी ठरते आहे. आपली शहरे आर्थिक घडामोडींची केंद्रे आहेत. त्याकडे अनेकदा देशाच्या आर्थिक वाढीमागील प्रेरक शक्ती म्हणून पाहिले जाते. पुणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे शहर असून, गेल्या काही दशकांत वाढ आणि विकासाच्या दृष्टीने खूप प्रगतिशील राहिले आहे. समृद्ध सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक महत्त्व, जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांमुळे पुण्याने संपूर्ण देशातून मोठ्या संख्येने लोक आणि व्यवसायांना आकर्षित केलं आहे. मात्र पुणे हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक म्हणून नावारूपाला येण्यासाठी, त्याच्या पायाभूत सुविधा आणि विकासामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करणे आवश्यक आहे.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : हेल्दी पुणे, स्मार्ट पुणे

पायाभूत सुविधा हा शहराची वाढ, विकासाचा कणा असतो. वाढती लोकसंख्या, आर्थिक घडामोडींसोबत वेग राखण्यासाठी त्यात सुधारणा झाली पाहिजे. वेगवान वाहतूक व्यवस्था, सोबतच रस्ते, पूल, सार्वजनिक वाहतूक आणि विमानतळं शहराच्या वाढीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात. त्याशिवाय पुण्याने औद्योगिक क्षेत्रं, परिषद केंद्र आणि बिझनेस पार्कच्या प्रगतीसाठी गुंतवणूक केली पाहिजे. जेणेकरून नोकऱ्यांच्या संधी निर्माण होऊन आर्थिक वृद्धीला हातभार लागेल. शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेतही सुधारणा झाली पाहिजे. कारण औद्योगिक आणि निवासी परिसर वृद्धीच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. शहराच्या आर्थिक विकासासाठी सध्याच्या पुणे विमानतळाचा विस्तार अतिशय महत्त्वाचा आहे. मुंबई विमानतळावर एकल उड्डाण मार्गिका (सिंगल रनवे) असल्याने दिवसाला एक हजार विमानांचे उड्डाण (टेक-ऑफ) आणि उतरण्याची (लँडिंग) क्षमता आहे. त्यामुळे सध्याच्या पुणे विमानतळावर हवाई दलाच्या सहभागाने आणि पायाभूत सुविधांमध्ये कोणताही बदल न करता उड्डाण आणि विमाने उतरण्याची संख्या का वाढवली जाऊ शकत नाही, याचे कोणतेही कारण नाही. त्याशिवाय नवीन विमानतळाची निर्मिती झाल्यास पश्चिम महाराष्ट्र म्हणून एक तृतीयांश महाराष्ट्राची सोय होईल. त्याचप्रमाणे विमानतळाची स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक वाढविणे, विमानतळावरील सुविधा अद्ययावत करणे, साहित्य ठेवण्यासाठी लागणाऱ्या जागेचा विस्तार आणि कार्गो टर्मिनल, धावपट्टीचा विस्तार या इतर घटकांकडेही ठोस लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पुणे हे संपूर्ण कार्यक्षम विमानतळ नसलेले सर्वात मोठे शहर आहे. मात्र या परिस्थितीत लवकरच सुधारणा होईल अशी आशा आहे.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : भविष्यवेधी शिक्षण व्यवस्था

विकासाधीन असलेले आणखी क्षेत्रे म्हणजे शिक्षण. पुणे हे शहर शैक्षणिक संस्था म्हणून सुपरिचित असले, तरीही व्यवसायाभिमुख शिक्षण व्यवस्था विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, जेणेकरून बाजारातील बदलत्या रोजगार संधींनुरूप विद्यार्थ्यांना कौशल्य आत्मसात करून यशस्वी होता येईल. संशोधन आणि विकासात गुंतवणूक केल्याने पुणे हे नवकल्पना आणि उद्योगजकतेचे केंद्र होऊन, जगभरातील सर्वोच्च प्रतिभेला आकर्षून घेऊ शकते. शिक्षणात गुंतवणूक करून कुशल कर्मचाऱ्यांना आकर्षित करून घेण्यात, धरून ठेवण्यात पुण्याचे स्थान इतर वेगाने पुढे जाणाऱ्या शहरांत सुस्थितीत आहे. सर्वोच्च दरडोई उत्पन्न निर्मिती करण्याची क्षमता पुण्यात असून ही ‘ज्ञान-आधारित अर्थव्यवस्था’ मानली जाते. अमेरिकेप्रमाणे आपण आगामी दहा वर्षांत दरवर्षी जगातील एक लाख विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या दृष्टीने देश आणि जगातील एक अग्रगण्य शैक्षणिक केंद्र निर्माण करण्यासाठी आवश्यक त्यात सर्व कृती कराव्या लागतील. जागतिक स्तरावरील उत्कृष्टतेचे केंद्र आणि शिक्षण केंद्र बनल्याने पुण्याला देशांतर्गत शिक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण, आर्थिक स्पर्धात्मकता वाढवणे, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग तयार करणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ज्ञान-आधारित अर्थव्यवस्थेकडे जाण्यास मदत होईल.

पुण्याचा विकासाचा मार्ग राखण्यासाठी, स्वच्छता आणि शाश्वततेवरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. शहराने हरित तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे, त्याची वाढ शाश्वत असून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची खात्री करण्यासाठी पर्यावरणास अनुकूल पद्धतींचा अधिकाधिक प्रचार केला पाहिजे. केंद्राच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत पुण्याचे मानांकन गेल्या वर्षीच्या पाचव्या क्रमांकावरून नवव्या स्थानावर घसरले आहे. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वर्गीकरण उपक्रम, नदी स्वच्छता आणि नदीकाठ विकास ही काही प्रमुख क्षेत्रे आहेत. त्यांचा शहराच्या भविष्यातील वाढ, विकास आणि अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडू शकतो. देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून आपण नावारूपाला येण्यासाठी शहराच्या पुढाकारातून एक ठोस कृती कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे. हे बदल केल्याने पुणे शाश्वत विकासात अग्रेसर होईल आणि पर्यावरणीय जबाबदारीसाठी वचनबद्ध असलेल्या कंपन्या आणि रहिवाशांना आकर्षित करेल.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणेरी सांस्कृतिकपण

पुढील दशकात देशातील उत्पादन उद्योगात ईव्ही म्हणजेच विजेवर चालणाऱ्या वाहनांचा सर्वात मोठा वाटा असेल. हे क्षेत्र देशातील रोजगाराचा सर्वात मोठा स्रोत ठरू शकते. त्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो. जर पुणे हे ‘ईव्ही हब’ झाले, तर ते कोल्हापूर, औरंगाबाद आदी शहरांचा समावेश असलेल्या महाराष्ट्रातील संपूर्ण परिसंस्थेसाठी उपयुक्त ठरेल. मजबूत संशोधन आणि विकास पायाभूत सुविधा, नवसंशोधन केंद्रांची वाढती संख्या, पन्नासहून अधिक संशोधन प्रयोगशाळा आणि संस्था या जोरावर पुणे हे ईव्ही संशोधन व विकासाचे राष्ट्रीय केंद्र बनू शकते. त्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये समान प्रावीण्य आणि नावीन्य आवश्यक आहे. पुणे शहर अनोख्या स्थानी आहे. कारण पुण्यात केवळ हार्डवेअर कौशल्यच नाही, तर सॉफ्टवेअरशी संबंधित अनेक कंपन्याही आहेत. सॉफ्टवेअरशी संबंधित घटकांमध्ये वाढीमुळे काहीतरी करण्याची उत्तम संधी आहे.

आपण करोना महासाथीला ज्या पद्धतीने हाताळले ते पाहता पुणे हे उत्तम आरोग्य सुविधांचे केंद्र आहे हे सिद्ध होते. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात आरोग्याशी संबंधित अनेक नवउद्यमी विकसित झाले आहेत. किफायतशीर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा, वैद्यकीय उपकरण उत्पादनाचे केंद्र होण्याची पुण्यात क्षमता आहे. त्या दृष्टीने जवळची शहरे आणि देशभरातून पुण्याने आकर्षित करून घेण्याची गरज आहे. सर्वाधिक खर्च आरोग्यनिगेसाठी होतो. त्यामुळे मूलभूत आरोग्यसेवा आणि निगा हव्या असलेल्या लोकांना आकर्षित करून घेतल्यास शहराच्या वैद्यकीय पर्यटनात आणि अर्थव्यवस्थेत मोठी भर पडेल. मात्र त्यासाठी आपल्याला अनेक मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांचा, आरोग्य सेवा केंद्रांचा समूह (क्लस्टर) तयार करावा लागेल.

जागतिक स्तरावर व्यवसाय करण्यासाठी चीनव्यतिरिक्त भारत हे एक गुंतवणुकीचे स्थान म्हणून उदयास येत आहे. धोरण आणि प्रक्रियात्मक सुधारणा, डिजिटायझेशन, संसाधनांची सुविधा, क्षमता वाढवणे, प्रोत्साहन देणे आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी परस्पर सहकार्य यासह प्रमुख अडथळे दूर करून पुण्यात उद्योगाची परिसंस्था निर्माण करण्यासाठी पाठबळाची आवश्यकता आहे. पुण्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान, नवकल्पना आणि कुशल कामगारांसह सेवांमधील विशेष प्रावीण्याचा (स्पेशलायझेशन) विकास फायद्याचा ठरेल. त्यासाठी कृती केली पाहिजे.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : नाटक ‘आपलं’ होण्यासाठी…

सरतेशेवटी व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी पुण्याने आपले शासन आणि प्रशासन सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नोकरशाहीतील अडथळे कमी करून प्रक्रिया सुव्यवस्थित करून आणि पारदर्शक, जबाबदार प्रशासनाद्वारे हे उद्दिष्ट साध्य करता येईल. शहराने आपले नागरिक आणि उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. शासन आणि प्रशासनात सुधारणा करून, व्यवसाय करण्यासाठी जगभरातील कंपन्या आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पुणे हे अधिक आकर्षक ठिकाण होईल. तर निष्कर्ष असा, की जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक होण्यासाठी पुण्याकडे सर्व आवश्यक घटक आहेत. मात्र विकासाचा मार्ग कायम ठेवण्यासाठी पायाभूत सुविधा, शिक्षण, शाश्वतता आणि प्रशासन सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. योग्य गुंतवणुकीसह आणि या प्रमुख क्षेत्रांसाठी वचनबद्धतेसह, पुण्यात आर्थिक विकासात अग्रेसर राहण्याची, इतर शहरांकरिता एक मॉडेल म्हणून नावारूपाला येण्याची क्षमता आहे. या बदलासाठी शहराने सक्रिय राहण्याची आवश्यकता आहे आणि आपल्या सर्व नागरिकांसाठी एक समृद्ध, चिरंतन समाजाच्या निर्मितीसाठी बलस्थानांचा वापर करून घेतला पाहिजे.
(लेखक पिनॅकल इंडस्ट्रीजचे संस्थापक-अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे माजी अध्यक्ष आहेत)

md.pinnacle@gmail.com

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-02-2023 at 17:52 IST