वाहनचालकांनी शक्य तितका हॉर्नचा वापर टाळावा, हॉर्न वाजवू नये हा संदेश देण्यासाठी आज(दि.12) पुण्यात नो हॉर्न डे पाळला जात आहे. हा उपक्रम सकाळी साडेआठ वाजेपासून सुरू झाला असून पुण्यातील तीस चौकांमध्ये उभं राहून लोकांमधे जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

‘लाइफ सेव्हिंग फाउंडेशन’तर्फे हा उपक्रम राबवला जात असून पुण्यातील वाहतूक हास्य क्लबचे ज्येष्ठ नागरिक, आय टी प्रोफेशनल्स, विद्यार्थी आणि वाहतूक पोलीस या उपक्रमात सहभागी झालेत. पुण्यात जवळपास ३७ लाखांहून अधिक वाहनांची नोंद आहे. त्यामुळे विनाकारण हॉर्न वाजवल्यास निर्माण होणारा गोंगाट, हॉर्नचा कर्णकर्कश्श आवाज यामुळे अनेकांना शारिरीक व्याधी आणि समस्या जडतायेत. हे रोखण्यासाठी नो हॉर्न डे पाळला जात आहे. वाहनचालकांना गरज नसल्यास हॉर्न वाजवू नका, असे आवाहन करीत संस्थेचे कार्यकर्ते जागृती करीत आहेत. या उपक्रमास खासगी कॅबचालक, रिक्षा संघटना, काही डॉक्‍टर संघटना, मेडिकलचालक विविध महाविद्यालयांनीही पाठिंबा दिला.