पुणे : महापालिकेचा मिळकतकर सवलतीच्या दरात भरता यावा, यासाठी आज (रविवारी) २९ जूनला सुटीच्या दिवशीही मिळकतकर भरणा केंद्र सुरू राहणार आहे. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांसह मुख्य इमारतीमध्ये असलेल्या भरणा केंद्रात जाऊन नागरिकांना मिळकतकर भरता येणार आहे. सवलतीच्या दरात मिळकतकर भरण्याची मुदत उद्यापर्यंत (३० जून) असून, मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांनी ३० जूनपर्यंत मिळकतकर भरल्यास त्यांना पाच ते दहा टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशीही मिळकतकर भरणा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या मिळकतकर विभागाने घेतला आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ही केंद्रे सुुरू राहणार आहेत.

नागरिकांना रोख रकमेसह धनादेश, डिमांड डाफ्ट, ऑनलाइन, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातूनदेखील मिळकतकर भरता येणार आहे. सवलतीमध्ये मिळकतकर भरण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी वेळेत मिळकतकर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिळकतकर विभागाने केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील नागरिकांना मिळकतकर भरता यावा, यासाठी रविवारी सुटीच्या दिवशी मिळकतकर भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. मिळकत कराचा भरणा १५ क्षेत्रीय कार्यालयांसह महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्येदेखील करता येणार आहे. – अस्मिता तांबे, सहायक आयुक्त, मिळकतकर विभाग