पुणे : राज्यातील यंदाचा बेदाणा निर्मितीचा हंगाम आटोपला आहे. राज्यात सुमारे १ लाख ६० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बेदाण्याचे उत्पादन १० हजार टनांची घटले आहे.  सध्या बेदाण्याचे दर १५०- २२० दरम्यान टिकून  आहेत.

राज्यातील सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक, आणि कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागांत बेदाणा तयार केला जातो. सांगली जिल्ह्यातील नागज परिसरात यंदा बेदाणा निर्मिती डिसेंबरमध्येच सुरु झाली होती. त्यानंतर बेदाणा हंगामास गती आली. मात्र, सातत्याने बदलत असलेल्या वातावरणाचा फटका बेदाणा निर्मितीवर झाला.  वातावरणातील बदल दर्जेदार बेदाणा निर्मितीस अडथळा ठरत होता. हंगाम लवकर सुरू झाल्याने बेदाणा उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता. हवामान बदल, अवकाळी पाऊस आदींमुळे उत्पादनात वाढ होण्याऐवजी घटच झाली आहे. या वर्षी अतिवृष्टीमुळे द्राक्षाचे नुकसान झाले होते. ती द्राक्षे बाजारात विकली जाणार नसल्यामुळे आणि अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे बेदाणा तयार करण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तयार झालेला बेदाणा दर्जेदार नव्हता. अखेरच्या टप्प्यात म्हणजे पंधरा मार्चनंतर तयार झालेला बेदाणा दर्जेदार आहे. बाजारात द्राक्षांना चांगला दर मिळत नसल्यामुळे बेदाणा निर्मितीत वाढ होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. केवळ नैसर्गिक आपत्तींमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या बेदाणा हंगाम १० हजार टनांची उत्पादन कमी झाले आहे.

यंदाच्या हंगामात बेदाण्याचे उत्पादन कमी झाले असले तरी, हंगामाच्या सुरुवातीपासूनच बेदाण्याच्या दरात फारशी तेजी-मंदी राहिली  नाही, दर स्थिर राहिले. होळी आणि रमजान सणांनिमित्त बेदाण्याच्या मागणीत वाढ

झाली होती. त्यामुळे दर टिकून राहिले. सध्या बेदाण्याच्या मागणीत सातत्य आहे, मागणी कमी झालेली नाही. सांगली, तासगाव आणि पंढरपूर या तिन्ही बाजारपेठेत आठवडय़ात सरासरी अंदाजे १ हजार ५०० टन बेदाण्याची विक्री होत आहे.

यंदाच्या द्राक्ष हंगामात अति तापमान, अवकाळी पाऊस, वादळी वारे, अशा अनेक आपत्तींचा सामना करावा लागला. ऐन काढणीच्या वेळी पाऊस झाल्यामुळे द्राक्षांना चव राहिली नाही. त्यामुळे बाजारातून असणारी मागणी घटली. परिणामी मागणी अभावी द्राक्षे पडून राहिल्याची स्थिती निर्माण झाली. अखेरच्या टप्प्यातील पावसात भिजलेल्या आणि दर्जा घसरलेल्या द्राक्षांपासून बेदाणा निर्मिती केली जात आहे. हा बेदाणा फारसा दर्जेदार नसेल. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा कमीच बेदाणा तयार झाला आहे. 

शिवाजी पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ

दर प्रति किलोत

एक नंबर प्रत – १६० ते २२०  

दोन नंबर प्रत – ११० ते १५०

तीन नंबर प्रत – १० ते ६०