scorecardresearch

“एका मुस्लीम पत्रकाराने बाळा नांदगावकरांना सांगितलं की…”, राज ठाकरेंनी भोंग्याला विरोध करताना दिलं ‘हे’ उदाहरण

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (१७ एप्रिल) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मनसेचा मशिदीवरील भोंग्यांना असणारा विरोध अधोरेखित केला.

Reaction on whether Bala Nandgaonkar will leave MNS

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (१७ एप्रिल) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मनसेचा मशिदीवरील भोंग्यांना असणारा विरोध अधोरेखित केला. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच एका मुस्लीम पत्रकाराचं उदाहरण देत मशिदीवरील भोंगे हा मुद्दा धार्मिक नसून सामाजिक असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच मुस्लिमांनी या गोष्टीकडे माणुसकी म्हणून या गोष्टीचा विचार करावा, असं आवाहन केलं.

राज ठाकरे म्हणाले, “मला दोन घोषणा करायच्या आहेत. त्यासाठी मीही पत्रकार परिषद घेतली. देशभरातील सर्वांना माझं एवढंच सांगणं आहे की हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. त्याकडे तसंच पाहिलं पाहिजे. एका मुस्लीम पत्रकाराने बाळा नांदगावकरांना सांगितलं की माझं लहान मुल जन्माला आलं तेव्हा सकाळच्या अजाण आणि बांग बंद करण्याबाबत मशिदीत जाऊन सांगितलं होतं. त्याचा लहान मुलाला त्रास होत होता. हा केवळ हिंदूना नाही तर मुस्लिमांना देखील त्रास होतो.”

“माणुसकी म्हणून मुस्लीम धर्मीयांनी या गोष्टींचा विचार करायला हवा”

“मनसे पक्ष म्हणून आमची सर्व बाजूंनी तयारी सुरू आहे. या महाराष्ट्रात आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दंगली नको आहेत. कोणत्याही प्रकारच्या हाणामाऱ्या नको आहेत. या देशातील महाराष्ट्रातील शांतता आम्हाला भंग करायची नाही, तशी इच्छा देखील नाही. माणुसकी म्हणून मुस्लीम धर्मीयांनी या गोष्टींचा विचार करायला हवा,” असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

“मुस्लिमांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही”

राज ठाकरे म्हणाले, “मुस्लिमांच्या प्रार्थनेला कोणीही विरोध केलेला नाही. त्यांना वाटत असेल की लाऊड स्पिकरवरच ऐकवणार, तर मग आमच्या आरत्या देखील त्यांना लाऊडस्पिकरवरून ऐकाव्या लागतील. तुम्ही जर दिवसातून पाचवेळा भोंगे लावणार असाल, तर आम्ही दिवसातून पाचवेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू.”

हेही वाचा : “देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांनी तयारीत राहा, आत्ता…”, राज ठाकरेंचं पुण्यातून आवाहन

“देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा. आत्ता रमजान सुरू आहे. त्यामुळे मला कोणतीही गोष्ट करायची नाही, पण त्यांना ३ मेपर्यंत काही समजलं नाही, त्यांना या देशातील कायद्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयापेक्षा स्वतःचा धर्म मोठा वाटत असेल, लाऊड स्पिकर वाटत असेल, तर मला वाटतं जशास तसं उत्तर देणं देखील गरजेचं आहे,” असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray give example of muslim journalist while opposing loud speaker on masjid in pune pbs

ताज्या बातम्या