चालू वर्षी जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तीन कोटी ६७ लाख ९० हजार रुपयांच्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. हा अहवाल वाढीव दराच्या फरकाच्या रकमेसह पाठविण्यात आला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना जादा मदत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा जून आणि जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णत: पक्की, कच्ची घरे आणि झोडपड्या अशा ४७९ घरांचे नुकसान झाले आहे. १६ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पशुधनामध्ये मोठी गुरे १३०, लहान ५८, इतर ७७ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. शेतीपीक आणि फळपीक मिळून २०६८.८६ हेक्टरचे नुकसान झाले आहे, तर १६.१५ हेक्टरवरील शेतजमीन वाहून गेली आहे. अतिवृष्टीमुळे तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : पुणे : जिल्ह्यातील विशेष शाळांची वर्षातून तीन वेळा तपासणी

दरम्यान, घरांच्या नुकसानीपोटी एक कोटी ३५ लाख ४४ हजार ६००, मृत पशुधनासाठी ७४ लाख ४२ हजार, शेतपीक आणि फळपिकाच्या नुकसानीपोटी एक कोटी ४५ लाख ७८ हजार, तर मृत आणि जखमी नागरिकांना द्यायच्या नुकसानीपोटी १२ लाख २५ हजार ४०० असा एकूण तीन कोटी ६७ लाख ९० हजार रुपयांचा अहवाल राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. हा अहवाल मान्य होऊन निधी प्राप्त होताच नुकसानग्रस्तांना निधीचे वाटप केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : राज ठाकरे परवा मुंबईत बोलले आणि मनसे कार्यकर्त्यांनी आज ‘करुन दाखवले’; पुण्यात ‘त्या’ बॅनरची तुफान चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक कोटी सात लाखांची वाढीव मागणी

या आधी तयार केलेल्या अहवालानुसार पूर्णत: आणि अंशत: पक्क्या व कच्च्या घरांच्या नुकसानीपोटी २९ लाख ९६ हजार ७०० रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये ९० लाख ३१ हजार ९०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मृत पशुधनासाठी यापूर्वी ५७ लाख २९ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये १७ लाख १३ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी घरे, गोठे, मृत पशुधन, मृत आणि जखमी नागरिक अशा एकूण नुकसानीपोटी दोन कोटी ५७ लाख ६५ हजार २८५ रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये एक कोटी सात लाख ६४ हजार ९०० रुपयांची वाढ करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.