पुणे : देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील महिलांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांची लूटमार करणाऱ्या, तसेच युवतीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपींपैकी एका संशयित आरोपीचे रेखाचित्र ग्रामीण पोलिसांनी तयार केले आहे. पसार संशयितांची माहिती पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पुण्यातून देवदर्शनासाठी मोटारीतून कुटुंब निघाले होते. सोमवारी (३० जून) पहाटे चारच्या सुमारास दौंड परिसरातील स्वामी चिंचोली गावाजवळील एका उपाहारागृहाजवळ त्यांनी मोटार थांबविली. मोटारीतून कुटुंब चहा पिण्यासाठी उतरले. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका महिलेला कोयत्याचा धाक दाखविला. डोळ्यात मिरची पूड टाकून महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर महिलेबरोबर असलेल्या युवतीला कोयत्याचा धाक दाखवून उपाहारगृहाच्या परिसरातील असलेल्या झाडीत नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. युवतीने आरडाओरडा केल्यानंतर चोरटे पसार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबाने दौंड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, दौंड, तसेच भिगवण पोलीस ठाण्यातील दहा पथके चोरट्यांच्या मागावर आहेत. फिर्यादीत दिलेल्या वर्णनानुसार, प्रत्यक्षदर्शींची चौकशी करून पोलिसांनी रेखाचित्र तयार केले आहे. संशयिताची माहिती असल्यास त्वरित उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस (मोबाइल क्रमांक : ९०४९६६४६७३), सहायक निरीक्षक राहुल गावडे (मोबाइल क्रमांक : ९८२३१६५०८०), सहायक निरीक्षक दत्ताजी मोहिते (मोबाइल क्रमांक : ८३०८८४४००४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.