पुणे : ‘जय भवानी, जय शिवराय’ आणि ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ चा अखंड जयघोष… शंख, हलगी आणि पारंपरिक वाद्यांचा गजर… भंडारा व फुलांची उधळण… छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर झालेली पुष्पवृष्टी… अशा वातावरणात सिंहगडावर रविवारी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित पालखी सोहळा थाटात साजरा झाला. तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन आणि छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी भगवे झेंडे घेऊन सिंहगडावर मानवंदना देण्यासाठी शिवभक्तांचा जनसागर लोटला.
विश्व हिंदू परिषद आणि श्री शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. छत्रपती राजाराम पुलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकापासून आयोजित दुचाकी फेरीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भगवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. त्यांच्या हस्ते सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शिल्पाचे पूजन झाले. सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, शरद जगताप, केतन घोडके, धनंजय गायकवाड यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.
सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत हलगी पथक, केशव शंखनाद पथक, ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन आणि सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन झाले.