पुण्यात वानवडी परिसरातील एका सभागृहाचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत पाच मजूर जखमी झाले आहेत. सोमवारी (२ मे) सायंकाळी ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

वानवडी भागात एका संस्थेकडून सभागृहाचे बांधकाम करण्यात येत आहे. बांधकाम सुरू असताना सायंकाळी पाचच्या सुमारास स्लॅब कोसळला.

हेही वाचा : पुणे : रिक्षाचालकाला प्रसादातून गुंगीचे औषध देऊन चोरट्यांनी लांबवली ५४ हजारांची सोनसाखळी

दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. स्लॅबखाली अडकलेल्या पाच मजुरांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.