काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ पक्षातील दिग्गजांना मिळता मिळत नाही. अशा परिस्थितीत, िपपरीतील काँग्रेसच्या चार सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कोणाचीही मध्यस्थी नसताना त्यांची वेळ मिळाली आणि तब्बल अर्धा तास त्यांनी सोनियांशी संवाद साधला. या चर्चेत काँग्रेसची सत्ता पुन्हा येईल, त्यासाठी सर्वच पातळीवर खूप संघर्ष करावा लागेल, असे मत सोनिया यांनी मांडले.
काँग्रेसचे चिंचवड विभागाचे अध्यक्ष संदेश नवले यांच्या नेतृत्वाखाली सुदाम ढोरे, आबा खराडे, कुंदन कसबे यांना सोनिया भेटीची संधी मिळाली. हिंदूीत झालेल्या संवादात, संसदेत आक्रमक झालेली काँग्रेस, भूसंपादन, इंदिरा गांधी यांच्या काळातील काँग्रेस, तेव्हाचे मेळावे, काँग्रेसचे एकेकाळी असलेले बैलजोडी चिन्ह आदी मुद्दय़ांवर सोनिया व कार्यकर्त्यांमध्ये संवाद झाला. सोनिया यांनी, देहू आणि आळंदी येथे दर्शनासाठी यावे, त्यानिमित्ताने पुणे व िपपरी-चिंचवडला यावे, जेणेकरून काँग्रेस कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ मिळेल, अशी विनंती त्यांनी केली. भेटस्वरूपात बैलजोडीची प्रतिकृती दिली असता उत्सुकतेपोटी त्यांनी कारण विचारले. तेव्हा बैलजोडी हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून एकेकाळी ते काँग्रेसचे चिन्ह होते, असे उत्तर या कार्यकर्त्यांनी दिले. पुढील काळात काँग्रेसचे भवितव्य काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी केला. तेव्हा काँग्रेसची निश्चितपणे सत्ता येणार, त्यासाठी कडवा संघर्ष करावा लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.