पुणे : ‘बहिणीच्या कल्याणाचा विचार करणारे भाऊ प्रत्येक घरात नसतात’ हे विधान अजित पवार यांना उद्देशून केले नसल्याचे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी दिले. माझ्यावर झालेल्या संस्कारानुसार मोठय़ा भावाचा सन्मान झाला पाहिजे, याच मताची मी आहे. मी अजितदादांविरोधात भूमिका मांडलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> “माझ्याकडील अर्थखातं पुढं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही, पण…”, अजित पवारांचं विधान




संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये जवळपास पूर्ण सदस्यांच्या पाठिंब्याने मंजूर झाले. त्यावरील चर्चेदरम्यान अमित शहा यांच्या टिप्पणीवर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. हे विधान सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांना उद्देशून असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यावर सुप्रिया सुळेंनी स्वत: स्पष्टीकरण दिले आहे. मानाच्या गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा >>> “सर्व आमदारांना घेऊन मोदींना १२ वेळा, शाहांना ३० वेळा अन् ट्रम्पना…”, रोहित पवारांचा सुनील शेळकेंना टोला
लोकसभेत महिला आरक्षणावर चर्चा सुरू असताना ‘भाजपकडून सर्व पुरुषांना बोलायची संधी दिली जात आहे’, असे विधान विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांनी केले होते. त्यानंतर ’महिलांच्या मुद्दय़ावर पुरुष बोलू शकत नाहीत का? भावांनी बहिणींच्या हिताचा विचार करणं ही देशाची परंपरा आहे’, अशी टिप्पणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. तो संदर्भ घेऊन ‘बहिणीच्या कल्याणाचा विचार करणारे भाऊ प्रत्येक घरात नसतात’ असे विधान केल्याचे स्पष्टीकरण सुळे यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे माझे मोठे बंधू आहेत. माझ्यावर झालेल्या संस्कारानुसार मोठय़ा भावाचा सन्मान झाला पाहिजे याच मताची मी आहे. मी त्यांच्याविरोधात भूमिका मांडलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.