मेट्रो रेल्वेचे इंजिन, डबे शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये

पुणे महामेट्रोने पिंपरी ते दापोडी या मेट्रो मार्गावर डिसेंबरअखेर प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा दावा केला होता. मेट्रो महिनाअखेपर्यंत सुरू होणार नसली तरी मेट्रो रेल्वेचे इंजिन आणि डबे िपपरी-चिंचवड शहरवासीयांना लवकरच पाहायला मिळणार आहेत. मेट्रोचे इंजिन आणि डबे रविवारी (२९ डिसेंबर) पिंपरीतील उन्नत मार्गावर चढविले जातील. तसेच सुरुवातीला काही अंतरात मेट्रोची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात येणार आहे.

महामेट्रोच्या वतीने पिंपरी ते दापोडीदरम्यानच्या साडेपाच किलोमीटर अंतरापैकी साडेतीन किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दोन किलोमीटरचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. विद्युतीकरणासाठी खांब उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच तीन मेट्रो स्थानकांचे काम वेगात सुरू आहे, अशी माहिती महामेट्रोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी दिली.

डिसेंबर अखेपर्यंत मेट्रोचे इंजिन आणि डबे संत तुकारामनगर येथे मेट्रो रुळावर चढविण्यात येणार आहेत. पुणे मेट्रोच्या डब्यांची बाह्य़ रंगरंगोटी आणि सजावट पूर्ण होऊन हे मेट्रो इंजिन तसेच डबे नागपूरहून पुण्याकडे आणण्यात येत आहेत. ते शनिवारी (२८ डिसेंबर) पुण्यात पोहोचतील, असेही सोनवणे यांनी सांगितले.

मेट्रो रेल्वेचे डबे स्टेनलेस स्टील या धातूपासून बनविण्यात आले आहेत. वजनाला हलके असलेल्या या मेट्रो डब्यांमध्ये अत्याधुनिक एलईडी दिवे लावण्यात आले असून बाह्य़ दिव्यांच्या प्रकाशाची तीव्रता आपोआप कमी अधिक करण्याची यंत्रणा त्यामध्ये आहे. मेट्रोचा वेग ताशी ९० किलोमीटर इतका असेल. मेट्रोमध्ये मोबाइल, लॅपटॉप, चार्जिगची सुविधा राहणार असून प्रवाशांसाठी दृक्-श्राव्य सूचना प्रणाली बसविण्यात आली आहे.