पुणे: रेल्वे गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाची कारवाई सुरू आहे. रेल्वेच्या पुणे विभागाने मे महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २६ हजाराहून अधिक जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्याकडून सव्वा दोन कोटी रुपयांहून जास्त दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे विभागात विनातिकीट प्रवाशांवर कारवाईसाठी सातत्याने तपासणी मोहिमा राबवल्या जात आहेत. मे महिन्यात केलेल्या कारवाईची आकडेवारी रेल्वेने जाहीर केली आहे. या कालावधीत पुणे विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २६ हजार १८८ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ कोटी २७ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा… पुणे: शेगावसाठी अकोला विमानतळ सुरू करा! मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अनियमित प्रवास करणाऱ्यांवरही रेल्वेने मागील महिन्यात कारवाई केली आहे. अनियमित प्रवास करणाऱ्या ७ हजार ८२५ जणांवर कारवाई करून ४८ लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच, नोंदणी न करता सामान घेऊन जाणाऱ्या १३९ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांना १४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…अन्यथा तुरुंगवासही होऊ शकतो!

रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम नियमितपणे सुरू आहे. प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊन प्रवास करावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. विनातिकीट प्रवशांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.