पुणे : परदेशी चलन व्यवहा करणाऱ्या व्यावसायिकाच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यंनी १९ लाख ५३ हजारांचे परदेशी चलन लांबविल्याची घटना बालेवाडी भागात घडली. चोरट्यांनी लांबविलेल्या चलनात अमेरिकन डाॅलर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, तसेच चीनमधील चलनाचा समावेश आहे.

याबाबत रोहित दिलीप मालुसरे (वय ४०, रा. सोमवार पेठ) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडीतील यशोद चौकात भागात मालुसरे यांचे कार्यालय आहे. एका इमारतीत असलेल्या कार्यालयातून ते परदेशी चलनाचे व्यवहार करतात. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप तोडले. चोरट्यांनी कार्यालयातील रोकड, तसेच विविध देशातील चलन असा १९ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सकाळी मालुसरे नेहमीप्रमाणे कार्यालयात आले. तेव्हा कार्यालयाचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

बाणेर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. चित्रीकरणाच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्यात येत असल्याची माहिती बाणेर पोलिसांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुकानातून २५ हजारांची रोकड लांबविली

कोथरूड भागातील एका चष्मे विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातून २५ हजारांची राेकड लांबविल्याची घटना घडली. याबाबत किशोर तळेकर (वय ३६, रा. लक्ष्मणकला हाईट्स, शेलार मळा,कात्रज) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रस्त्यावर कोथरूड बसस्थानकासमोर लुणाव काॅम्प्लेक्स इमारतीत टायटन आयवेअर लेन्स अँड स्पेक्टस दुकान आहे. बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गल्ला उचकटून चोरट्यांनी २५ हजारांची रोकड लांबविली. पोलीस उपनिरीक्षक दीक्षित तपास करत आहेत.