पुणे : क्वॅकेरली सायमंड्स (क्युएस) जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये राज्यातील तीन उच्च शिक्षण संस्थांनी स्थान प्राप्त केले आहे. त्यात आयआयटी मुंबई आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्यावर्षीच्या तुलनेत कामगिरी उंचावली आहे.
क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी २०२३ जाहीर करण्यात आली. या क्रमवारीसाठी जगभरातील १४२२ संस्थांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यात भारतातील ४१ आयआयटी, विद्यापीठांचा समावेश आहे. शैक्षणिक प्रतिष्ठा, विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय शिक्षक, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, संशोधन अशा विविध निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. या क्रमवारीत आयआयटी मुंबईने पहिल्या दोनशे संस्थांमध्ये स्थान मिळवत १७२वा क्रमांक मिळवला. गेल्यावर्षी आयआयटी मुंबई १७७व्या स्थानी होते. तर गेल्यावर्षी ५९१ ते ६०० या गटात असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कामगिरी उंचावत ५४१ ते ५५० या गटात स्थान मिळवले. तर मुंबई विद्यापीठ गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही १००१ ते १२०० या गटात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान ५० क्रमांकांनी उंचावल्याचा आनंद आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अनेक संकल्पना स्वीकारत त्यांची पुनर्बांधणी विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. बहुविद्याशाखीय कार्यक्रम आणि संशोधनाच्या अंमलबजावणीमुळे आणखी उंची गाठण्यात मदत होईल. शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पुणे विद्यापीठातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी सांगितले.