पुणे : पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण वाढीस लागल्याने शेतकऱ्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात मोठी घट झाली आहे. पावसामुळे सर्व फळभाज्यांचे दर तेजीत असतानाच टोमॅटोच्या दरात घट झाल्याने गृहिणींना काहीसा दिलासा मिळाला आहे.

‘पुणे, मुंबईतील बाजारात पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, शिरूर आंबेगाव, जुन्नर, तसेच नाशिक परिसरातून टोमॅटो मोठ्या प्रमाणावर विक्रीस पाठविले जातात. पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो विक्रीस पाठविला आहे. रविवारी (२९ जून) श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आठ ते दहा हजार पेटी टोमॅटो विक्रीस पाठविण्यात आला. एका पेटीत साधारणपणे २० ते २२ किलो टोमॅटो असतात. टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे,’ असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी सांगितले.

घाऊक बाजारात टोमॅटो वगळता अन्य फळभाज्यांचे दर तेजीत आहेत. पावसामुळे फळभाज्यांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. मटार, शेवग्याला सर्वाधिक दर मिळाले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

टोमॅटोची आवक अपेक्षेपेक्षा जास्त झाली. आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात घट झाली. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने दरात घट झाली आहे. – प्रकाश ढमढेरे, भाजीपाला विक्रेते, किरकोळ बाजार

पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. टोमॅटोवर डाग पडले आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो विक्रीस पाठविल्याने दरात मोठी घट झाली आहे. – विलास भुजबळ, ज्येष्ठ अडते, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल

मे महिन्यापासून पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पाऊस सुरू आहे. पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. टोमॅटो डागळल्याने शेतकऱ्यांनी काढणी करून बाजारात विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात चांगले दर मिळण्याची शक्यता असल्याने मंचर, शिरूर, खेड, मंचर, आंबेगाव, जुन्नर परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो लागवड केली. मात्र, पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतात टोमॅटो खराब होण्यापेक्षा लागवड झालेल्या टोमॅटोची तोडणी करून शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. – अजित तांबे, शेतकरी, वरूडे, ता. शिरुर, जि. पुणे

टोमॅटोचे दर

घाऊक बाजार – १०० ते १८० रुपये (दहा किलो)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरकोळ बाजार- १५ ते ३० रुपये (एक किलो)